पुण्यामध्ये सध्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचा दुसरा सामना वेलोसिटी आणि सुपरनोव्हाज यांच्यात खेळला गेला. वेलोसिटी संघाने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवणाऱ्या सुपरनोव्हाजला मात्र या दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करला. वेलोसिटी संघाची फिरकी गोलंदाज माया सोनावणे या सामन्यात चर्चेचा विषय ठरली.
माया सोनावणे (Maya Sonawane) साठी हा त्यांचा पदार्पणाचा सामना होता, ज्यामध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधले. हमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील सुपरनोव्हाज (Supernovas) संघाला सोनावणेने दोन षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये तब्बल १९ धावा खर्च केल्या. यादम्यान तिला एखादी विकेट देखील घेता आली नाही. पण तिची चर्चा या प्रदर्शनासाठी नाही, तर तिच्या अनोख्या ऍक्शनसाठी झाली.
माया सोनावणेची गोलंदाजी ऍक्शन पाहून अनेकांनी तिची तुलना शिविल कौशिकशी केली आहे, ज्याने यापूर्वी आयपीएल फ्रँचायझी गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले होते. दक्षिण आफ्रिकी दिग्गज पॉल एडम (Paul Adams) देखील अशाच ऍक्शनसाठी ओळखला जायचा. सोनावणे सध्या २३ वर्षांची आहे आणि तिने महिलांच्या वरिष्ठ टी-२० स्पर्धेत चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना तिने ८ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या होत्या आणि यादरम्यान तिचा इकोनॉमी रेट ६च्या आसपास होता.
https://twitter.com/WomensCricCraze/status/1529053774093746176?s=20&t=TxrZ4r6f7ShotKxgMYbvmw
दीप्ती शर्माच्या नेतृत्वातील वेलोसिटी (Velocity) संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोव्हाजने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. वेलोसिटी संघाच्या केट क्रॉसने सर्वोत्तम गोलंदाजी केली. क्रॉसने टाकलेल्या ४ षटकात २४ धावा खर्च केल्या आणि महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. या दोन्ही विकेट्स क्रॉसने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये घेतल्यामुळे सुपरनोव्हाजला मोठा झटका मिळाला. सुपरनोव्हाजने अवघ्या १८ धावांवर त्यांच्या सुरुवातीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या.
हरमनप्रीतने मात्र कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. तिने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेलोसिटी संघासाठी सलामीवीर शेफाली वर्माने ५१ धावा केल्या. तर चौथ्या क्रमांकावर लॉरा वोल्वार्ड्सने देखील नाबाद ५१ धावा केल्या. या दोघींच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर वेलोसिटी संघाने १८.२ षटकात सामना जिंकला. कर्णधार दीप्तीने नाबाद २४ धावांचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीममेटनेच हरमनप्रीतला दिला दगा अन् झाली रनआऊट, मैदान सोडताना अशी काढली भडास – Video