ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची भारतीय महिला संघाची ही पहिलीच वेळ आहे. तेही उपांत्य सामना न खेळता त्यांनी हा पराक्रम केला आहे.
झाले असे की, या विश्वचषकात आज(५ मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला उपांत्य सामना रंगणार होता. मात्र हा सामना पावसामुळे नाणेफेकही न होता रद्द झाला.
त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
आता 8 मार्च रोजी मेलबर्न येथे हा अंतिम सामना होणार आहे. मात्र, ज्या प्रकारे आज पावसामुळे उपांत्य सामना रद्द झाला, त्याप्रमाणेच जर अंतिम सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कोणाला घोषित केले जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
याआधी पावसाची शक्यता लक्षात घेता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसीला विनंती केली होती की, उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात यावा. पण आयसीसीने त्यांच्या या विनंतीला नकार दिला होता. पण आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच जर अंतिम सामना 8 मार्चला पावसामुळे पूर्ण झाला नाही तर हा सामना 9 मार्चला होईल.
पण जर 9 मार्चलाही पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सामना झाला नाही तर आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही संघाना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येणार आहे.
याआधी 2002मध्ये कोलंबो येथे पुरुष आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध श्रीलंका संघात अंतिम सामना होणार होता. मात्र पावसामुळे राखीव दिवशीही सामना न झाल्याने या दोन्ही संघाना संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते.
यावेळी श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 227 धावा केल्या होत्या. त्यांनी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताने 8.4 षटकात 1 बाद 34 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने हा सामना रद्द करून राखीव दिवशी ठेवण्यात आला. परंतु त्या दिवशीही पाऊस पडल्यामुळे हा सामना पूर्ण झाला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
–वर्ल्डकपची फायनल आणि हरमनप्रीत कौरचा बर्थ डे – घडणार मोठा इतिहास
–विराट कोहलीचा टी२० वर्लडकपच्या फायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियाला खास संदेश
–इंग्लंडची कर्णधार म्हणते, टी२० विश्वचषकात ‘तो’ पराभव आम्हाला भोवला