क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणजेच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. स्पर्धेतील आतापर्यंत 38 सामने पार पडले आहेत. आता स्पर्धेच्या 39व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने- सामने असणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने मोठे विधान केले आहे. तो म्हणाला आहे की, आता त्यांचा संघही इतर अव्वल संघांसारखाच आहे.
काय म्हणाला शाहिदी?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) म्हणाला की, ते चालू विश्वचषकात इतर अव्वल संघांच्या बरोबरचे आहेत. तो म्हणाला, “विश्वचषक इतिहासात आमचे प्रदर्शन तितके खास राहिले नाहीये. आम्ही फक्त एक सामना जिंकला आहे. मात्र, या विश्वचषकात येऊन आम्हाला विश्वास आहे की, आम्ही चांगले करू शकतो. जे अंतर आधी आमच्याकडे होते, आता मला वाटते की, आम्ही त्या अव्वल संघांसारखेच आहोत. आम्ही आता शिकत आहोत, पण प्रतिभेच्या बाबतीत माझा विश्वास आहे की, आम्ही एक चांगला संघ आहोत.”
अफगाणिस्तानची स्पर्धेतील कामगिरी
अफगाणिस्तान संघासाठी विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धा यशस्वी ठरली आहे. कारण, संघाने आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तसेच, त्यांच्याकडे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी अजूनही संधी आहे. मागील 3 सामन्यात शाहिदीच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकासारख्या संघांना आव्हानाचा पाठलाग करताना पराभूत केले आहे. यावरून दिसते की, त्यांच्यातही चांगलीच क्षमता आहे. अशात ऑस्ट्रेलिया संघासाठी हा सामना सोपा नसेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
अफगाणिस्तान 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र
विशेष म्हणजे, 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तान आधीच पात्र ठरला आहे. आता त्यांच्याकडे चालू विश्वचषकातील उपांत्य फेरीतही जागा बनवण्याची संधी आहे. संघाने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे पॉईंट्स टेबलमध्ये 8 गुण असून ते सहाव्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानने विजय मिळवला, तर त्यांचा उपांत्य फेरीतील मार्ग मोकळा होईल. अशात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, अफगाणिस्तान सलग 5 सामने जिंकून येत असलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यशस्वी होतो की नाही. (world cup 2023 afghan captain hashmatullah shahidi says afghanistan are equal to other top teams)
हेही वाचा-
‘शाकिबसाठी खूप आदर होता, पण आता…’, बांगलादेश संघ आणि अंपायरवर बरसला Angelo Mathews
‘मला ॲंजेलोने रिक्वेस्ट केली, पण….’, बांगलादेश कर्णधार शाकिबचा धक्कादायक खुलासा