आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा एक दिवसाची पाहुणी आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे हा बहुप्रतिक्षित सामना रंगणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडू शानदार फॉर्ममध्ये दिसले आहेत. यामध्ये शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश आहे. मागील सामन्यात तो शतक ठोकण्यास मुकला होता. तसेच, आता तो अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळू शकतो. अशातच शुबमन गिलचे आजी-आजोबा यांनी आपल्या नातवाला वर्ल्डकप फायनल मॅचसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना शुबमन गिल (Shubman Gill) याचे आजोबा दिदार सिंग (Shubman Gill’s Grandfather Didar Singh) म्हणाले की, “मला वाटते की, तो तेव्हा 6 वर्षांचा होता. त्यावेळी त्याने किचनमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान केले होते. त्याची आजी मला म्हणालेली, ‘याला क्रिकेटर बनवा.’ पुढच्या आठवड्यात मी शेतकरी युनियनमध्ये बैठकीत भाग घेण्यासाठी जालंधरला गेलो. मी तिथून एक नेट, तीन बॅट, पॅड आणि एक डझन लेदर चेंडू विकत घेऊन आलो. जेव्हा मी आयपीएल पाहण्यासाठी अहमदाबादेत गेलो होतो, तेव्हा मला जाणवले की, माझा नातू एक मोठा स्टार बनला आहे. खूप लोक मला भेटायला येत होते. ते शुबमनबद्दल विचारत होते. फक्त एक क्रिकेटपटू म्हणून नाही, तर एक व्यक्ती म्हणून ते शुबमनचे कौतुक करत होते.”
शुबमनची आजी काय म्हणाली?
“मी त्यांना (आपल्या पतीकडे इशारा करत) आधीच सांगून ठेवलं आहे की, अंतिम सामना सुरू झाल्यानंतर मी माझी खुर्ची सोडणार नाही. त्यांना स्वत: चहा बनवावा लागेल,” असे शुबमन गिलची आजी म्हणाली. त्या पुढे म्हणाल्या की, “आम्ही अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला गेलो होतो, पण निराश होऊन परतलो होतो. कारण, आमचा मुलगा दिसतच नव्हता. टीव्हीवर सामना पाहणे चांगले वाटते. तिथे शुबमनचा चेहरा दिसतो. आपण सामना नक्की जिंकू.”
विश्वचषकात शुबमनचे प्रदर्शन
विश्वचषक 2023 स्पर्धेत शुबमन गिल याने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 50च्या सरासरीने 350 धावा केल्या आहेत. विश्वचषकात त्याची बॅट चांगलीच तळपत आहे. अहमदाबादच्या मैदानावरील त्याचे प्रदर्शन पाहायचे झाले, तर त्याने आयपीएल 2023मध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे एकूण 7 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 404 धावा केल्या होत्या. यावेळी त्याची सरासरी 77ची होती. अशात अंतिम सामन्यात त्याच्याकडून सर्वांना शानदार प्रदर्शनाची आशा आहे. (world cup 2023 ind vs aus final shubman gill grandparents dada dadi interview she said Told my husband he’ll have to make tea himself once final starts)
हेही वाचा-
चॅम्पियन भारतच! World Cup Final साठी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन्सचीही टीम इंडियाला पसंती
World Cup Final: टीम इंडियाच्या विश्वविजयासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे, पाहा व्हिडिओ