गत-उपविजेत्या न्यूझीलंड संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून 70 धावांनी पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंड संघाच्या पराभवानंतर कर्णधार केन विलियम्सनचे विधान चर्चेत आहे. त्याने यावेळी सर्वप्रथम भारतीय संघाचे अभिनंदन करत कौतुकही केले. त्यानंतर आपल्या संघाच्या पराभवाबद्दल भाष्य केले.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 397 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला 48.5 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 327 धावाच करता आल्या. अशाप्रकारे भारताने 70 धावांनी विजय मिळवला. या विजयाचा नायक मोहम्मद शमी (Mohammed Shami) ठरला. त्याने 7 विकेट्स घेतल्या. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
काय म्हणाला विलियम्सन?
पराभवानंतर केन विलियम्सन (Kane Williamson) म्हणाला की, “सर्वप्रथम भारतीय संघाचे अभिनंदन. त्यांनी शानदार खेळ दाखवला. त्यांचा हा सर्वोत्तम सामना होता. 400 धावांचे आव्हान नक्कीच कठीण होते. मात्र, अखेरपर्यंत झुंज दिल्याबद्दल आमच्या खेळाडूंना श्रेय देऊ इच्छितो. विश्वचषकातून बाहेर पडण्याची निराशा आहे, पण मागील 7 आठवड्यात माझ्या संघाने जो प्रयत्न केला आहे, त्याचा मला अभिमान आहे.”
न्यूझीलंडचा कर्णधार पुढे बोलताना असे म्हणाला की, “आमच्या संघाने प्रयत्न केला, पण जसे मी म्हणालो की, भारत अव्वल दर्जाचा संघ आहे. त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. त्यांनी पूर्णवेळ आमच्यावर दबाव बनवला. तुम्ही क्रीझवर येऊन 400 धावा करणे सोपे नाहीये. भारत या विजयाचा हक्कदार आहे. कारण, त्यांनी शानदार खेळ दाखवला. आज आमचा दिवस नव्हता, पण क्रीझवर जाऊन स्वत:ला संधी देणे चांगले वाटले.”
“येथील प्रेक्षक शानदार होते. अविश्वसनीय माहोल होता. पाठिंबा एकतर्फी होता, पण स्पर्धेचा भाग बनवून चांगले वाटले. भारताने इथे आमचे चांगले आयोजन केले. आमच्या संघाच्या काही खेळाडूंनी अतुलनीय योगदान दिले. एका संघाच्या रूपात आम्ही क्रिकेटमध्ये समर्पण दाखवले की, आम्ही कसे खेळतो,” असेही पुढे प्रेक्षकांविषयी बोलताना विलियम्सन म्हणाला.
संघाच्या खेळाडूंचे कौतुक करताना विलियम्सन म्हणाला, “रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांनी संपूर्ण स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले. त्यांनी वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर चांगले प्रदर्शन करून दाखवले. आमच्या गोलंदाजांनीही झुंज दिली. मला माझ्या संघाचा अभिमान आहे. निकाल जरी आमच्या बाजूने लागला नसला, तरीही एक संघाच्या रूपात आम्ही पुढे जात राहिलो. आम्ही योग्य दिशेने काही चांगली पावलंही टाकली आहेत.”
विलियम्सनची स्पर्धेतील कामगिरी
केन विलियम्सन विश्वचषक 2023 स्पर्धेत फक्त 4 सामने खेळला, पण यादरम्यान त्याने शानदार प्रदर्शन केले. त्याने 4 सामन्यात तब्बल 85.33च्या सरासरीने 256 धावा केल्या. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतकेही निघाली. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्याविषयी बोलायचं झालं, तर त्याने 73 चेंडूंचा सामना करत 69 धावा केल्या. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. (world cup 2023 ind vs nz skipper kane williamson praise india for amazing run in tournament says this read here)
हेही वाचा-
Semi Final 2: जागा एक, दावेदार 2! भारताशी फायनल खेळण्यासाठी कोलकात्यात भिडणार SA vs AUS, वाचा सविस्तर
‘क्राऊड शांत झालं होतं, आम्हाला वाटलं…’, सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवताच रोहितचे मोठे विधान
ना विराट, ना शमी, ना श्रेयस! टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो रोहितच; पाहा कुणी केलंय भाष्य