भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी विभागातील हुकमी एक्का मोहम्मद सिराज हा विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध खूपच महागडा ठरला होता. त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वात महागडा स्पेल टाकला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून त्याला वगळण्याची चर्चा सुरू होती. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास सिराजने सार्थ ठरवला. त्याने शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात मोलाचे योगदान देत संघातील आपले महत्त्व सिद्ध केले. यानंतर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला सिराज?
सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “तुम्ही नेहमी एकसारखे प्रदर्शन करू शकत नाहीत. आलेख नेहमी खाली येतो. त्यामुळे मी विचार करतो की, मी एका सामन्यामुळे वाईट गोलंदाज नाहीये. मी नेहमी माझा आत्मविश्वास उंच ठेवतो की, माझी गोलंदाजी चांगली आहे आणि मी अव्वल गोलंदाज असले पाहिजे. हा आत्मविश्वास मला गोलंदाजीवेळी मदत करतो. जर मी सामना गमावला, तर मी वाईट गोलंदाज बनू शकत नाही. मी असे करण्यासाठी स्वत:ला पाठिंबा दिला आहे. मला आज त्याचा निकाल मिळाला आहे.”
पाकिस्तानविरुद्ध चमकला सिराज
खरं तर, मोहम्मद सिराज याने दिल्ली येथील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 9 षटके गोलंदाजी करत तब्बल 76 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही सुरुवातीला त्याने खूप धावा खर्च केल्या, पण नंतर त्याने दोन मोठ्या विकेट मिळवून दिल्या.
त्याने शानदार फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर अब्दुल्ला शफीक (20) याला तंबूत पाठवत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर कर्णधार बाबर आजम (50) यालाही तंबूचा रस्ता धरायला भाग पाडले. अशाप्रकारे सिराजने या सामन्यात 8 षटके गोलंदाजी करताना 50 धावा खर्चून 2 मोठ्या विकेट नावावर केल्या. (world cup 2023 mohammed siraj after impressive bowling against pakistan in ahmedabad said this)
हेही वाचा-
INDvsPAK: लाजीरवाऱ्या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा संचालक कडाडला; म्हणाला, ‘आज रात्री…’
Video: दारुण पराभवानंतर बाबर बनला ‘किंग कोहली’चा फॅन, भारतीय दिग्गजाकडून जर्सीवर घेतला ऑटोग्राफ