मँचेस्टर। आज(16 जून) आज भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आयसीसी क्रिकेट विश्वचषकात 22 वा सामना पार पडला आहे. या सामन्यात भारताने 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विश्वचषकातील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा संघ 337 धावांचा पाठलाग करताना 35 षटकात 6 बाद 166 धावांवर असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पाकिस्तानचा डाव डकवर्थ लूईस नियमानुसार 40 षटकांचा करण्यात आला. तसेच पाकिस्तानसमोर 302 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
त्यानुसार पाकिस्तान पावसाच्या व्यत्ययानंतर फलंदाजीला उतरल्यावर त्यांच्यासमोर 5 षटकात 136 धावांचे अशक्यप्राय आव्हान होते.
पाऊस पडण्याआधी पाकिस्तानकडून इमाम उल हकची(7) पहिली विकेट गेल्यानंतर बाबर आझम आणि फखर जामनने चांगली भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला होता. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचली.
पण त्यांची ही जोडी तोडण्यात कुलदीप यादवला यश आले. कुलदीपने आझमला 48 धावांवर बाद केले. त्यानंतर कुलदीपने त्याच्या पुढच्याच षटकात फखरलाही 62 धावांवर बाद केले. फखरची 62 धावांची खेळी पाकिस्तानच्या डावातील सर्वोच्च खेळी ठरली.
हे दोघे बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. त्यामुळे पाकिस्तानला 40 षटकात 6 बाद 212 धावाच करता आल्या. भारताकडून विजय शंकर, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने 140 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.
त्याचबरोबर रोहित आणि केएल राहुलने सलामीला फलंदाजी करताना 136 धावांची शतकी भागीदारी रचली. राहुलने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.
विराटने राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीला येत रोहितला चांगली साथ देताना दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचली. रोहित बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने 19 चेंडूत 26 धावांची छोटेखानी खेळी केली. तसेच त्याने विराटबरोबर 51 धावांची भागीदारीही रचली.
एमएस धोनीला मात्र खास काही करता आले नाही. तो 1 धाव करुन बाद झाला. विराटने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. तो बाद झाल्यानंतर आणखी पडझड होऊ न देता केदार जाधव(9*) आणि विजय शंकरने(15*) भारताला 336 ची धावसंख्या गाठून दिली.
पाकिस्तानकडून मोहम्मद अमिरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच हसन अली आणि वहाब रियाजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताने या सामन्यात विजय मिळवला असला तरी भारताला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने या सामन्यात फक्त 2.4 षटके गोलंदाजी केली. त्यानंतर तो उर्वरित सामन्यात खेळण्यासाठी उतरला नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारतीय संघाला जोरदार धक्का; हा खेळाडू पडला उर्वरित सामन्यातून बाहेर
–टॉप १०: हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळीबरोबरच केले हे खास १० विक्रम
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये रचला मोठा इतिहास!