---Advertisement---

WPL 2026: मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्ट्रिक, दिल्ली कॅपिटल्सने घेतला बदला

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 6:21 AM
---Advertisement---

वुमन्स प्रीमियर लीग 2026 मध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सची अडचण वाढतच चालली आहे. सलग तिसऱ्या पराभवासह मुंबईने या मोसमातील एकूण चौथा सामना गमावला आहे. डब्ल्यूपीएलच्या चौथ्या हंगामातील 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सनी मात करत विजयी पुनरागमन केलं.

बडोद्याच्या कोटांबी येथील बीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने दिल्लीसमोर 155 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 6 चेंडू राखून आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत आपला या मोसमातील दुसरा विजय नोंदवला. विशेष म्हणजे, 10 जानेवारीला मुंबईकडून झालेल्या पराभवाची दिल्लीने याच सामन्यात परतफेड केली.

दिल्लीच्या विजयाचा पाया सलामीवीर शफाली वर्मा आणि लिझेल ली यांनी घातला. दोघींनी 7.3 षटकांमध्ये 63 धावांची भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. शफाली वर्माने 24 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या, मात्र त्यानंतर ती बाद झाली. यानंतर लिझेल ली आणि लॉरा वोल्वार्ड्ट यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 21 धावा जोडल्या. लिझेलने 28 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 46 धावांची आक्रमक खेळी केली. तिच्या या खेळीने दिल्लीचा विजयाच्या दिशेने प्रवास सुकर झाला.

लिझेल बाद झाल्यानंतर कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्स आणि लॉरा वोल्वार्ड्ट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. लॉरा 17 धावांवर माघारी परतली. त्यानंतर जेमिमाह आणि मारिजान काप यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 37 धावांची भागीदारी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

जेमिमाह रॉड्रिग्सने 37 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 51 धावांची संयमी आणि विजयी खेळी केली. मारिजान कापने नाबाद 10 धावांची साथ दिली. मुंबईकडून अमनजोत कौर आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्याआधी दिल्लीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीस भाग पाडलं. मुंबईला 20 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 154 धावाच करता आल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने 41 धावा केल्या, तर नॅट सायव्हर-ब्रंटने एकाकी झुंज देत 45 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 65 धावा केल्या.

नॅटच्या अर्धशतकाव्यतिरिक्त मुंबईकडून इतर फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. दिल्लीकडून श्री चरणीने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या, तर मारिजान काप आणि नंदिनी शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत महत्त्वाची झेप घेतली असून, मुंबई इंडियन्ससमोरील आव्हाने मात्र अधिक कठीण होत चालली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---