चिंतेचा डोंगर डोक्यावर घेऊन साहा खेळला न्यूझीलंडविरुद्धची मालिका; वाचा काय घडलेले

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने नुकत्याचा पार पडलेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन केले. साहाने कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात नाबाद ६१ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मदत मिळाली होती. मात्र, पहिल्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत देखील झाली होती. तसेच यादरम्यान साहाची पत्नी देखील आजारी होती आणि तो तिच्या तब्येतीची विचारपूस देखील करत होता.
पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जेव्हा साहा १ धाव करून बाद झाला तेव्हा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अगदी त्याच काळात साहा स्वतःच्या आणि पत्नीच्या दुखापतीला तोंड देत होता. पहिल्या डावात मानेला झालेल्या दुखापतीमुळे तो यष्टीरक्षण करण्यासाठी उपस्थित नव्हता. पण त्यानंतर दुखापतीवर इलाज करून तो दुसऱ्या डावात फळंदाजी करण्यासाठी आला आणि चार वर्षांनंतर त्याचे कसोटीमधील अर्थशतक केले.
न्यूज नाइनसोबत याबाबत बोलताना साहा म्हणाला, “हा खूप कठीण आणि संघर्षमय काळ होता. कोणत्याच खेळाडूसोबत रोज अशा गोष्टी होत नाहीत. मला फक्त फळंदाजी करायची होती, जोपर्यंत माझे शरीर साथ देईल. कारण त्यावेळी भारतीय संघाला तेच हवे होते.”
साहाने पुढे सांगितले की, “रोमीला डेंगू झाला होता आणि स्टेडियममधून हॉटेलमध्ये पोहोचताच मी डॉक्टर्स आणि तिच्या जवळच्या व्यक्तिंशी बोलायचो. हे सोपे नव्हते, पण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे तिची काळजी घेतली. नितिन पटेल आणि मेडिकल स्टाफने सतत काम करून मला फलंदाजी करण्यासाठी तयार केले. सोबतच मला हे देखील पाहायचे होते की, कोलकातामध्ये माझ्या पत्नीला ज्या गोष्टीची गरज आहे, त्या मिळाव्यात. ती आता ठीक आहे आणि मी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी तिच्यासोबत वेळ घालवू शकलो आहे.”
“मी मालिकेसाठी पूर्णपणे तयार होतो आणि योगदान देऊ इच्छित होतो. कानपूरच्या पहिल्या डावात असे होऊ शकले नाही. नंतर मानेला दुखापत झाली. दुसऱ्या डावाच्या आधी मी जास्त काही विचार केला नव्हता. फिजिओंनी मला फलंदाजीसाठी तयार केले. मी दुखापतीमुळे फलंदाजीत काही बदल केले. आनंद आहे की, गरजेच्या वेळी संघासाठी धावा करू शकलो. प्रसिद्ध म्हण आहे की, कष्टाशिवाय काहीच साध्य होत नाही,” असे साहा पुढे म्हणाला.
दरम्यान, साहा भारताचा एक अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज असला, तरी त्याला संघासाठी खेळण्याच्या अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. एमएस धोनीमुळे त्याला संघात संधी मिळत नसायची. आता रिषभ पंतमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जात नाही. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत रिषभ पंत विश्रांतीवर होता, त्यामुळे साहाला खेळण्याची संधी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या –
माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा
“आपण ९ वर्षात अनेक आयसीसी ट्रॉफी जिंकू”; बीसीसीआय अध्यक्षांनी तयार केला प्लॅन