विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 2 दिवसांवर येऊन ठेपला असून क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे लागून आहेत. 18 जूनपासून साउथम्पटनच्या एजेस बाऊल मैदानावर हा सामना होणार असून या पहिल्यावहिल्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. भारतीय तसेच न्युझीलंडच्या संघ व्यवस्थापणाने आपल्या 15 सदस्यीय चमुची घोषणाही केली आहे. अशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनेही (आयसीसी) मंगळवारी (15 जून) या अंतिम सामन्यासाठी इंग्लिश समालोचन करण्यासाठी संघाची यादी जाहीर केली आहे.
आयसीसीने समालोचकांच्या पॅनलमध्ये 9 सदस्यांची निवड केली आहे. त्यामध्ये भारतीय संघाचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्याव्यतिरिक्त भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा देखील समावेश आहे. याशिवाय श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा देखील समालोचन करताना दिसेल.
या सदस्यांमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन, न्युझीलंड संघाचा माजी दिग्गज सायमन डोल यांचा देखील समावेश आहे. इशा गुहा या एकमेव महिलेचा या चमूत समावेश आहे, ज्या दीर्घ काळापासून पुरुष क्रिकेटमध्ये समालोचन करत आहेत. या 9 सदस्यीय समालोचकांच्या चमूत इयान बिशप आणि मायकल आर्थटन यांच्याव्यतिरिक्त न्युझीलंडचे माजी दिग्गज क्रेग मॅक यांचा देखील समावेश आहे.
या अंतिम सामन्यावर संपूर्ण क्रिकेटविश्वाची नजर टिकून असून, या पाहिलीवहिल्या अजिंक्यपद स्पर्धेत कोण बाजी मारेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. न्युझीलंड संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका जिंकून आपला हेतू स्पष्ट केला आहे. तर भारतीय संघ देखील जय्यत तयारीनिशी मैदानावर उतरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नादच खुळा! विराटपेक्षा दुप्पट महागड्या घरात राहतो युवराज सिंग; किंमत वाचून फिरतील डोळे
आमिरच्या चेंडूवर फलंदाजाने गुडघ्यावर बसत खेचला चौकार, मग गोलंदाजाने चिडून केलं असं काही