साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा मंगळवारी पाचवा दिवस होता. पहिल्या चारही दिवशी पाऊस आणि कमी प्रकाशामुळे आलेल्या व्यत्ययानंतर अखेर पाचव्या दिवशी पूर्णवेळ खेळ झाला. पाचव्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ३० षटकांत २ बाद ६४ धावा केल्या आहेत. भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे.
तसेच या सामन्यातील पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे पूर्णपणे वाया गेला असल्याने बुधवारी (२३ जून) राखीव दिवशी उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सत्रात दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिलने चांगली सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीला कोणताही धोका न पत्करता धावफलक हलता ठेवला होता. मात्र, ११ व्या षटकात गिल ३३ चेंडूत ८ धावा करुन टीम साऊथीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. या विकेटसह साऊथीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स पूर्ण केल्या.
गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने रोहितसह डाव सांभाळला. त्यांनी पहिल्या डावातील ३२ धावांची पिछाडीही भरुन काढली. मात्र, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर रोहित ३० धावांवर साऊथीविरुद्धच खेळताना २७ व्या षटकात पायचीत झाला. त्यानंतर मात्र, पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने आणखी पडझड होऊ दिली नाही. विराट ८ धावांवर आणि पुजारा १२ धावांवर नाबाद आहेत.
न्यूझीलंडची आघाडी
न्यूझीलंडचा डाव ९९.२ षटकांत २४९ धावांवर संपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात डेवॉन कॉनवेने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विलियम्सनने ४९ धावांची खेळी केली. याशिवाय काईल जेमिसन २९, टीम साऊथी ३० आणि टॉम लॅथम ३० यांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश आले.
भारताकडून मोहम्मद शमीने २६ षटकांत ७६ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त इशांत शर्माने ३ विकेट्स, आर अश्विनने २ आणि रविंद्र जडेजाने १ विकेट घेतली.
विलियम्सनचे अर्धशतक हुकले
पहिल्या सत्राखेरपर्यंत ५ विकेट्स गमावलेल्या न्यूझीलंडने दुसऱ्या सत्रात थोडा आक्रमक खेळ केला. एका बाजू केन विलियम्सनने भक्कमपणे सांभाळली होती. त्याला ६ व्या विकेटसाठी सुरुवातीला कॉलिन डी ग्रँडहोमने चांगली साथ दिली होती. मात्र, तो ३० चेंडूत १३ धावा करुन मोहम्मद शमी विरुद्ध खेळताना पायचीत झाला.
त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या काईल जेमिसनने आक्रमक खेळ केला. त्याने १६ चेंडूत १ षटकारासह २१ धावा केल्या. त्याने आक्रमक खेळ करत न्यूझीलंडची पिछाडी भरुन काढण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. पण, त्याचे आक्रमण मोहम्मद शमीने जसप्रीत बुमरहाच्या हातून त्याला झेलबाद करत संपवले.
तो बाद झाल्यानंतर विलियम्सन अर्धशतक करेल असे वाटत असतानाच त्याला इशांत शर्माने ९४ व्या षटकात त्याला बाद केले. त्याचा उत्तम झेल विराट कोहलीने घेतला. त्यामुळे १७७ चेंडूत ४९ धावांवर विलियम्सनला माघारी परतावे लागले. त्याचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले.
विलियम्सन बाद झाला असला तरी न्यूझीलंडने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला होता.
विलियम्सन बाद झाल्यानंतर नील वॅग्नर शुन्यावर अश्विन विरुद्ध खेळताना बाद झाला. पण अखेरच्या विकेटसाठी साऊथी आणि बोल्टने १५ धावा जोडत न्यूझीलंडला २४९ पर्यंत पोहचवले. साऊथीला ३० धावांवर रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत करत न्यूझीलंडचा पहिला डाव संपवला.
पहिले सत्र शमीने गाजवले
पाचव्य दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यास पावसामुळे साधारण १ तास उशीर झाला. पण अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजता सामना सुरु झाला. या दिवशी पहिल्या सत्रात मोहम्मद शमीने त्याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नसल्याने पाचव्या दिवशी न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाखेरच्या २ बाद १०१ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडकडून तिसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेले कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर पाचव्या दिवशी फलंदाजीसाठी उतरले.
या दोघांनीही सावध सुरुवात केली. त्यांनी पाचव्या दिवसाच्या पहिल्या १० षटकांत केवळ ११ धावा केल्या. दरम्यान, भारतीय गोलंदाजांकडून पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी होत होती. असे असतानाच डावाच्या ६४ व्या षटकात मोहम्मद शमीने रॉस टेलरला ११ धावांवर बाद केले. शुबमन गिलने त्याचा अफलातून झेल घेतला.
त्यानंतर हेन्री निकोल्सने विलियम्सनला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तो ७ धावांवर खेळत असताना इशांत शर्माने ७० व्या षटकात त्याला रोहित शर्माच्या हातून झेलाबाद केले. पाठोपाठ ७१ व्या षटकात शमीने आपला अखेरचा सामना खेळत असलेल्या बीजे वॉटलिंगला त्रिफळाचीत करत न्यूझीलंडला ५ वा धक्का दिला.
त्यामुळे पहिले सत्र संपेपर्यंत न्यूझीलडने ७२ षटकात ५ बाद १३५ धावा झाल्या आहेत. विलियम्सन १९ धावांवर नाबाद आहे, तर कॉलिन डी ग्रँडहोम ० धावांवर नाबाद आहे.