भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मागील तीन दिवसांपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगला आहे. साउथॅम्पटन येथे सुरू असलेल्या या ऐतिहासिक सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून) न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. परिणामी, भारतीय संघ अवघ्या २१७ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करत दिवसाखेर २ बाद १०१ धावांपर्यंत मजल मारली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा सादर केला.
न्यूझीलंडचे सुरेख क्षेत्ररक्षण
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारताचा डाव २१७ धावांवर गुंडाळला. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांनी सुयोग्य साथ देत काही नेत्रदीपक झेल घेतले तसेच, चापल्ययुक्त क्षेत्ररक्षण केले. त्यांच्या क्षेत्ररक्षणाचा एक व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.
टिम साऊदी, टॉम लॅथम व रॉस टेलर यांनी स्लीपमध्ये झेल टिपून गोलंदाजांच्या यशात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. कॉलिन डी ग्रॅंडहोम, हेन्री निकोल्स व केन विलियम्सन यांनीदेखील मैदानी क्षेत्ररक्षणात बाजी मारली. अनुभवी यष्टीरक्षक व आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या बीजे वॉटलींग यानेदेखील आपल्या यष्टीरक्षणाने सर्वांची मने जिंकली.
The focus was on New Zealand's skills on Day 3 of the #WTC21 Final.#INDvNZ
These are your @bira91 Best Fielding Moments 👇 pic.twitter.com/7tD0UyAvBz
— ICC (@ICC) June 20, 2021
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे पारडे जड
न्यूझीलंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या तीन दिवसांवर वर्चस्व गाजवलेले दिसून येते. कायले जेमिसनच्या पाच बळींच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपविला. भारतासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ तर, कर्णधार विराट कोहली यांनी ४४ धावा बनविल्या.
न्यूझीलंडने पहिल्या डावात, टॉम लॅथम व डेवॉन कॉनवे यांनी ३४.२ षटकात ७० धावांची सलामी दिली. लॅथम ३० धावांवर बाद झाल्यानंतर कॉनवेने आपला शानदार फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपण्यासाठी दोन चेंडू शिल्लक असताना तो ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर ५४ धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाखेर, न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा बनविला होत्या. कर्णधार केन विलियम्सन व अनुभवी रॉस टेलर हे न्यूझीलंडसाठी मैदानावर आहेत. पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
स्व:तावर बनविलेला मीम पाहून मायकेल वॉन म्हणतोय, ‘हे आवडलंय’