आयसीसीने कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी २०१९ मध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. या मोठ्या सामन्यासाठी दोन्हीही संघांनी आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अशात न्यूझीलंड संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन जुर्गनसेन यांनी कोणता भारतीय फलंदाज किवी गोलंदाजांना अडचणीत टाकू शकतो? याबाबत भाष्य केले आहे.
शेन जुर्गनसेन यांनी टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “रिषभ पंत हा एक अतिशय धोकादायक खेळाडू आहे. जो स्वतः संपूर्ण खेळ बदलू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध त्याने केलेली कामगिरी आम्ही पाहिली. तो एक अतिशय सकारात्मक विचारसरणीचा खेळाडू आहे. त्याला लवकरात लवकर बाद करणे खूप गरजेचे असणार आहे. त्यासाठी तो संधी देखील देतो.”
“आमच्या गोलंदाजांनी जितकं शक्य होईल तितकी चांगली कामगिरी करणे आणि पंतला धावा करण्यापासून रोखणे गरचेचे असणार आहे. तो एक मनमोकळेपणाने खेळणारा फलंदाज आहे. तसेच तो जर फॉर्ममध्ये असेल तर त्याला बाद करणे खूप गरजेचे असेल, हे आम्हाला विसरून चालणार नाही,” असे त्यांनी पुढे म्हटले.
थोडक्यात सांगायचे झाले तर, न्यूझीलंड संघाला विराट कोहली, रोहित शर्मा किंवा चेतेश्वर पुजारा अशा मोठमोठ्या भारतीय फलंदाजांना बाद करण्याची जास्त चिंता नाही. परंतु त्यांना यष्टीरक्षक रिषभ पंतला बाद करण्याची चिंता जास्त सतावत आहे.
जेमिसन आणि कोहली यांच्यात रंगणार चांगलीच स्पर्धा
न्यूझीलंड संघात ट्रेंट बोल्ट आणि टीम साउथी सारखे दिग्गज गोलंदाज असताना देखील शेन जुर्गनसेन यांनी काइल जेमिसनचे कौतुक केले आहे. जेमिसनने आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
त्यांनी म्हटले की, “आयपीएल स्पर्धेत जेमिसन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून खेळला आहे. यात काहीच शंका नाही की, दोघांनी (विराट आणि जेमिसन) एकमेकांसोबत चर्चा केली असेल. जे आपल्याला या अंतिम सामन्यात देखील पाहायला मिळेल. मला खात्री आहे की, जेमिसनला खेळताना पाहून आनंद होईल. त्याची कसोटी कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. आम्हाला इंग्लंड संघाविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, ज्यामुळे आम्हाला सराव करण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय गोलंदाजांचे केले कौतुक
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलताना शेन म्हणाले, “भारताकडे आक्रमक गोलांदाजी क्रम आहे. त्यांच्याकडे गोलंदाजीसाठी पर्याय देखील उपलब्ध आहेत. आम्ही जसप्रीतपासून ते शार्दुलचा सामना करू. शार्दुल एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. हे त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखवून दिले होते. यासोबतच मोहम्मद सिराज देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
विराट अन् रोहितचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील? २३७ विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणतो…
उच्चशिक्षित भारतीय शिलेदार, ज्याची डिग्री अशी की इस्त्रो किंवा नासामध्ये लागली असती नोकरी; पण…