न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक खेळला जात आहे. या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये असे काही सामने झाले, ज्यामध्ये दोन्ही संघांत घासून संघर्ष झाला. वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांच्यातील सामनाही असाच घासून झाला. विश्वचषक स्पर्धेतील हा १७ वा सामना होता आणि यामध्ये वेस्ट इंडीज संघाने शेवटच्या क्षणी ४ धावांनी विजय मिळवला.
वेस्ट इंडीजने सामन्याच्या शेवटच्या षटकात बांगलादेशला मात दिली आणि ४ धावांनी विजय मिळवला. महिला विश्वचषकात (ICC Women’s World Cup 2022) यापूर्वी खेळलेल्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडीज संघाने न्यूझीलंडविरुद्ध ३ धावांनी, तर इंग्लंडविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला होता.
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ मात्र वेस्ट इंडीजवर भारी पडले आणि त्यांचा पराभव केला. असे असले तरी न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना वेस्ट इंडीजने धूळ चारली, ही गोष्ट दुर्लक्षीत करता येणार नाही. वेस्ट इंडीजच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटची स्पर्धा अधिक रोमांचक बनली आहे.
सामन्याचा विचार केला, तर बांगलादेश महिला संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघाने मर्यादित ५० षटकांमध्ये १४० धावा केल्या आणि यादरम्यान त्यांच्या ९ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात बांगालदेश संघ शेवटच्या षटकापर्यंत खेळला, परंतु त्यांना लक्ष्य गाठता आले नाही. बांगालादेशने ४९.३ षटकांमध्ये १३६ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. शेवटच्या षटकात बांगलादेशला ८ धावांची आवश्यकता होती, परंतु संघाकडे शेवटची विकेट राहिली होती, जी त्यांनी गमावली.
खेळपट्टी गोलंदाजीसाठी पूर्णपणे अनुकूल होती आणि फलंदाज मात्र धावा करण्यासाठी झगडताना दिसले. मात्र अशा परिस्थितीतही वेस्ट इंडीजची यष्टीरक्षक फलंदाज शेमेन कॅम्पबेल (Shemaine Campbelle) हिने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिली. तसेच वेस्ट इंडीजसाठी सलामीवीर हेले मॅथ्यूज (Hayley Matthews) १८ धावा केल्या आणि गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन केले. मॅथ्यूजने टाककेल्या १० षटकांमध्ये १५ धावा खर्च करून महत्वाच्या चार विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनासाठी मॅथ्यूजला सामनावीर पुरस्कारही दिला गेला.
महत्वाच्या बातम्या –
काय आहे एमएस धोनीच्या ‘जर्सी नंबर- ७’चे रहस्य? खुद्द ‘माही’नेच केलाय खुलासा