बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल हा प्रथमच भारतीय संघात खेळताना दिसेल. त्याच्यावर निवडीनंतर आता त्याचे वडील चंद्रपाल यांची खूप भावनिक प्रतिक्रिया आली आहे.
यश दयाल हा 2023 आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. साखळी फेरीचा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज असताना, यश दयाल अखेरचे षटक टाकत होता. तेव्हा रिंकू सिंग यांनी सलग पाच षटकार खेचत आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. यानंतर यश हा हंगामात एकही सामना खेळला नाही. तो नैराश्यात गेल्याचे सांगण्यात येत होते.
यात सर्व कालावधीविषयी बोलताना यशचे वडील म्हणाले, “त्यावेळी आम्ही सगळेच खूप निराश झालो होतो. आमच्या घरापासून शाळेची बस जात असताना, त्यातील लहान मुले देखील रिंकू सिंग.. रिंकू सिंग असे म्हणून चिडवायची. याच काळात यश आजारीही पडला. मात्र, आम्ही त्याला कधीच हार मानू दिली नाही. आम्ही एक कुटुंब म्हणून वचन दिले आणि यशला सांगितले, ‘तू जोपर्यंत भारतासाठी खेळत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्या मागे ठाम राहू. तू हार मानू नको.”
ते पुढे म्हणाले, “तो कधीही हार मानणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी आणि माझे कुटुंब त्याला प्रवृत्त करत राहू. आम्ही यशला समजावून सांगितले की, हे काही पहिल्यांदाच घडले नाही आणि शेवटही नाही. युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला सहा षटकार ठोकलेले. त्यानंतर ब्रॉड हा आतापर्यंतचा महान वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला.”
यशने आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले. त्याने हंगामात 14 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या. दुलीप ट्रॉफी सामन्यात भारत ब च्या 76 धावांनी भारत अ संघावर मिळवलेल्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा-
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन बनला संघमालक, खरेदी केला ‘या’ टीमचा हिस्सा