यशपाल शर्मा 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला भारताच्या मधल्या फळीतील एक महत्त्वाचे फलंदाज होते. त्यांच्या भक्कम बचाव तंत्रामुळे ते आपली विकेट सहजासहजी पडू द्यायचे नाहीत. त्याच्याकडे तांत्रिक मर्यादा असल्या तरी ते धाडस, चिकाटी आणि संयमानं यावर मात करायचे. या सर्व गोष्टींमुळे यशपाल शर्मा 1979 ते 1983 पर्यंत भारताच्या मधल्या फळीचे कणा म्हणून ओळखले जायचे.
यशपाल शर्माचं 2 ऑगस्ट 1979 रोजी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण झालं होतं. तर 13 ऑक्टोबर 1978 रोजी त्यांचं पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय पदार्पण झालं. यशपाल शर्मा 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. त्यांनी भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी 89 धावा केल्या, ज्यासाठी त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. भारतानं हा सामना 34 धावांनी जिंकला होता. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही त्यांनी 61 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताला 6 विकेट्सनं विजय मिळाला होता.
1983 च्या विश्वचषकानंतर यशपाल शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. 1987-88 मध्ये ते पंजाबमधून हरियाणाला गेले आणि त्यानंतर रेल्वेसाठीही खेळले. निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी काही काळ अंपायरिंगही केलं. यशपाल शर्मा नेहमी हसत राहायचे. त्यांची बोलण्याची पद्धतही अनोखी आणि आकर्षक होती.
यशपाल शर्मा केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही धैर्य आणि जिद्दीसाठी ओळखले जायचे. 1984 च्या दंगलीत त्यांनी चेतन चौहानसह उत्तर विभागीय संघाच्या तीन शीख खेळाडूंना रेल्वे प्रवासात वाचवलं होतं. नवज्योत सिंग सिद्धू, योगराज सिंग आणि राजिंदर घई यांना डब्यात लपवल्यानंतर शर्मा आणि चौहान यांनी दंगलखोरांच्या जमावासमोर उभं राहून या तिघांना कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेतली होती.
यशपाल यांनी डिसेंबर 2005 पर्यंत दोन वर्षे भारतीय संघाचे निवडकर्ते म्हणून काम पाहिलं. 2008 मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती झाली. त्यानंतर ते सहकारी कृष्णमाचारी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये सामील झाले. या निवड समितीनं 2011 विश्वचषक जिंकणारा संघ निवडला होता. भारतासाठी 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळलेले यशपाल शर्मा यांचं 2021 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
हेही वाचा –
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये कोहली रचणार इतिहास? ‘या’ दिग्गजांना सोडणार मागे
सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणखी एका महिला बॉक्सरवर पुरुष असल्याचा आरोप, जागतिक स्पर्धेत घातली होती बंदी