मागीलवर्षी 31 मार्चला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पार पडला होता. या सामन्यातून प्रयास राय बर्मन या युवा क्रिकेटपटूने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
त्यावेळी तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला होता. त्याने जेव्हा आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याचे वय 16 वर्षे 157 दिवस एवढे होते. त्याने हा विक्रम करताना मुजीब उर रेहमान या अफगाणिस्तानच्या गोलंदाजाला मागे टाकले. मुजीब उर रेहमानने 2018 मध्ये 17 वर्षे 11 दिवस एवढे वय असताना किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
प्रयासने मागील मोसमात केवळ हा एकच सामना आयपीएलमध्ये खेळला. त्याने या सामन्यात 19 धावा केल्या होत्या. तसेच त्याला 4 षटके गोलंदाजी केल्यानंतरही एकही विकेट मिळाली नव्हती.
त्याचबरोबर प्रयास हा डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात करोडपती झालेला सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला होता. त्याला 20 लाख या त्याच्या मुळ किंमतीपेक्षा आठपटीने अधिक 1.5 कोटी रुपयांची बोली लावत बेंगलोरने संघात सामील करुन घेतले होते.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे क्रिकेटपटू-
16 वर्षे 157 दिवस – प्रयास राय बर्मन
17 वर्षे 11 दिवस – मुजीब उर रेहमान
17 वर्षे 152 दिवस – रियान पराग
17 वर्षे 177 दिवस – सर्फराज खान
17 वर्षे 179 दिवस – प्रदिप सांगवान
17 वर्षे 199 दिवस – वॉशिंगटन सुंदर
ट्रेंडिंग घडामोडी –
क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारे ५ फलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ५ खेळाडू
२१ वर्षांपुर्वी चौथ्या डावात लाराने अशी काही फलंदाजी केली की सगळं जग लाराचा झालं फॅन