---Advertisement---

भारताच्या २ विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला युसुफ पठाण क्रिकेटमधून निवृत्त

On: शुक्रवार, फेब्रुवारी 26, 2021 4:52 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाणने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) जाहीर केले आहे. त्याने ट्विटवर प्रसिद्धी पत्रक जाहीर करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

युसुफ २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ सालच्या वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. विशेष म्हणजे त्याने २००७ च्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

युसुफने ट्विट केले आहे की ‘मी माझ्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे, संघांचे, प्रशिक्षकांचे आणि सर्व देशाचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानतो.’ या ट्विटमध्ये युसुफने प्रसिद्धीपत्रक जाहीर करताना २०११ सालच्या विश्वचषकातील सचिनबरोबरचा फोटो आणि २००७ विश्वचषकातील धाकटा भाऊ इरफानबरोबरील फोटो शेअर केला आहे.

तसेच त्याने त्याच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘भारतासाठी २ विश्वचषक जिंकणे आणि सचिन तेंडुलकरला माझ्या खांद्यावर घेणे माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे.’ याबरोबर त्याने त्याच्या कारकिर्दीतील त्याच्या कर्णधारांचेही त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत. याशिवाय त्याने बीसीसीआय आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनलाही धन्यवाद म्हटले आहे.

तसेच भाऊ इरफानबद्दलही प्रेम व्यक्त करताना त्याने म्हटले आहे की तो त्याच्या पाठिशी कायम उभा राहिला. त्याचबरोबर युसुफने आता निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आली असल्याचेही सांगितले आहे.

युुसुफची कारकिर्द –

युसुफने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५७ वनडे सामने खेळले असुन यात २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ४१.३६ च्या सरासरीने ३३ विकेट्सही घेतल्या. तसेत त्याने २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना २३६ धावा केल्या असून १३ विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच युसुफने १०० प्रथम श्रेणी सामने खेळताना ११ शतके आणि २० अर्धशतकांसह ४८२५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २०१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने १९९ अ दर्जाचे सामने खेळले असून यात त्याने ४७९७ धावा केल्या आहेत. यात त्याने ९ शतके आणि २८ अर्धशतके केली आहेत. तसेच १२४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात २७४ सामन्यात १ शतक आणि २१ अर्धशतकांसह ४८५२ धावा केल्या आहेत आणि ९९ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल कारकिर्द 

त्याचबरोबर आयपीएलमध्ये युसुफने कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले असून त्याने एकूण १७४ सामने खेळले आहेत. यात त्याने ३२०४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतकाचा आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर तो ३ वेळा आयपीएल विजेत्या संघाचाही भाग राहिला आहे. त्याने २००८ सालामध्ये राजस्थान रॉयल्सकडून आणि २०१२ व २०१४ साली कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

त्याने २०१० सालच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्स विरुद्ध ३७ चेंडूत केलेले शतक आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक आहे. तसेच भारतीय खेळाडूने ठोकलेले हे आयपीएलमधील सर्वात जलद शतक आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटसाठी काय पण! विमान सोडून कारने शार्दुल ठाकूरने केला ७०० किमीचा प्रवास, कारण कौतुकास्पद

विराटच्या परदेशी चाहतीने लुटला इंग्लंडच्या पराभवाचा आनंद, मग काय भिडले ट्विटरवॉर

मोठी बातमी! कारकिर्दीत ९०० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूची निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---