भारतीय संघातून दीर्घ काळापासून बाहेर असलेल्या काही खेळाडूंनी गेल्या काही कालावधीत निवृत्तीचा मार्ग स्वीकारणे, पसंत केले आहे. यात अशोक दिंडा, नमन ओझा, युसूफ पठाण, विनय कुमार अशा काही नामवंत खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र यातील काही खेळाडू लवकरच मैदानावर परतणार आहेत.
‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ या स्पर्धेद्वारे विनय कुमार, नमन ओझा आणि युसूफ पठाण पुन्हा एकदा आपल्या खेळाने चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत. या स्पर्धेत ते इंडिया लिजेंड्स या संघाकडून खेळताना दिसतील. आगामी मार्च महिन्यात ही स्पर्धा रायपुर येथे खेळवली जाईल. स्पर्धेचे सगळे सामने रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळवले जातील.
सनथ जयसूर्यासह इतरही दिग्गज होणार सहभागी
पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ या स्पर्धेसाठीच्या इंडिया लिजेंड्स संघाची घोषणा याआधीच करण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपद मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरडे देण्यात आले असून वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान असे इतरही माजी प्रसिद्ध खेळाडू या संघाचा भाग आहेत.
भारताशिवाय श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश हे संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शनिवारी श्रीलंकेच्या संघाची देखील घोषणा करण्यात आली. तिलकरत्ने दिलशानच्या नेतृत्वाखालील या संघात सनथ जयसूर्यासह रसेल अर्नोल्ड आणि उपुल थरंगा यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
कालपासूनच विदेशी संघ रायपुरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. २६ फेब्रुवारी रोजी इंग्लंड लिजेंड्सचा संघ रायपुरात दाखल झाला आहे. याशिवाय बांग्लादेशचा संघही २७ फेब्रुवारीला म्हणजे आज या स्पर्धेसाठी दाखल होईल. या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता इंडिया लिजेंड्स आणि बांग्लादेश लिजेंड्स या संघांमध्ये खेळवला जाईल. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या स्पर्धेचे उद्घाटन करतील.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार हे बदल, उमेश यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता
संतापजनक! ऍरॉन फिंचच्या खराब कामगिरीनंतर चाहत्याने पत्नीला दिली धमकी, आक्षेपार्ह भाषेचा केला वापर