-महेश वाघमारे
युवराज सिंग म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भावनेशी निगडीत नाव. 2000 ते 2017अशी तब्बल अठरा वर्ष त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिली. निवृत्तीनंतरही, क्रिकेटशौकीन त्याला विसरले नाहीत. खरंतर, कधीच विस्मृतीत जाणार नाही अशी कामगिरीच युवराजने केली आहे. आपले चापल्ययुक्त क्षेत्ररक्षण, सहा चेंडूत सहा षटकार, 2011वर्ल्डकपमधील लाजवाब प्रदर्शन आणि त्यानंतर कॅन्सरसारख्या आजारावर मात करत, पुन्हा त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा, असा हा प्रवास क्रिकेटप्रेमी विसरणे कसं शक्य आहे? हाच आपला युवराज आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 12 डिसेंबर 1981 साली चंदिगड येथे झाला होता.
पण, हा युवराज सिंग, ज्यावेळी पहिल्यांदा भारतीय संघासाठी खेळणार होता, त्या रात्री त्याला झोप लागली नव्हती. तसंतर, राष्ट्रीय संघासाठी खेळणार आहोत, हा विचार करून अनेकांना झोप लागत नाही. पण, युवराजचे कारण मात्र वेगळे होते.
पंजाबच्या एकोणीस वर्षाखालील संघासाठी जबरदस्त कामगिरी केल्याने, युवराजची 2000 सालच्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठीच्या, भारतीय संघात वर्णी लागली. श्रीलंकेमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारत मोहम्मद कैफच्या नेतृत्वात खेळला. अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेला हरवत, भारताने विश्वचषक जिंकला आणि स्पर्धेचा मालिकावीर होता युवराज योगराज सिंग. आपल्या अष्टपैलू खेळाने युवराजने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील सात खेळाडूंना बेंगलोर मधील, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळाला. त्या सात खेळाडूंपैकी युवराज एक होता. वासू परांजपे आणि रॉजर बिन्नी यांनी त्या खेळाडूंवर मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ त्या दोघांच्या नजरेत भरले.
त्याचवर्षी, ऑक्टोबर मध्ये ‘आयसीसी नॉक आउट ट्रॉफी’ म्हणजे आत्ताची ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ होणार होती. त्या संघात एकोणीस वर्षाच्या युवराज सिंगची निवड झाली. गेली अनेक वर्ष ज्यांचा खेळ पाहत युवराज मोठा झाला होता त्या, सचिन, गांगुली, कुंबळे, द्रविड यांच्या समवेत तो आता ड्रेसिंगरूम शेअर करायला सज्ज झाला.
भारतीय संघ या स्पर्धेसाठी केनियाला रवाना झाला. भारताचा पहिला सामना यजमान केनियाविरुद्ध 3 ऑक्टोबर रोजी होता. दोन दिवस सराव केल्यानंतर, सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, कर्णधार गांगुलीने युवराजला सांगितले की, “युवी, उद्या तयार रहा. भारतीय संघासाठी तू खेळतोय. मिडल ऑर्डरमध्ये चार- पाच नंबरला तुझी बॅटिंग येईल.”
इतके बोलून गांगुली निघून गेला. इकडे युवराजला आभाळ ठेंगणे झाले. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न उद्या पूर्ण होणार होते. भारतीय संघासाठी पदार्पण आणि तेही आपल्या आवडत्या जागेवर फलंदाजी करताना या दोन्ही गोष्टींनी युवराज उत्साहित झाला.
रात्रीचे जेवण झाल्यावर, युवराज आपल्या रूममध्ये झोपण्याची तयारी करत होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. युवराजला वाटले रूम सर्विस असेल म्हणून त्याने दार उघडले आणि पाहतो तर दारात सौरव गांगुली उभा होता. गांगुलीने आपले नेहमीचे स्माईल दिली आणि बोलला.
“युवी, थोडा चेंज आहे तू उद्या मिडल ऑर्डर नाही तर ओपन करणार आहेस. चालेल ना?”
आत्तापर्यंत, कायम मधल्या फळीत फलंदाजी केलेला युवराज उद्या सलामीला खेळावे लागणार हे ऐकून पुरता गांगारून गेला. काही क्षण थांबत त्याने उत्तर दिले, “ओके सर”
गांगुली “गुड नाईट” म्हणत आपल्या रूमकडे निघून गेला.
युवराज पूरता घाबरून गेला होता. आत्तापर्यंत, कोणत्याच स्तरावर त्याने सलामी फलंदाजी केली नव्हती. मधल्या फळीत फलंदाजीचा त्याला पुरेसा अनुभव होता. सोबतच, त्याजागी फलंदाजी करायला तो मानसिकदृष्ट्याही सक्षम होता. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. उद्याचा सामना आपला पहिला सामना आणि तोही ओपनर म्हणून ! फेल झालो तर, पुन्हा संधी मिळेल की नाही ? अशा एक ना अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात घर केले.
तो बेडवर पडून झोपायचा प्रयत्न करु लागला. पण, झोपसुद्धा लागत नव्हती. थोडावेळ, रूम मध्येच चकरा घालून, त्याने शेवटी झोपेची गोळीदेखील खाल्ली. पण, झोप काही लागली नाही. उद्याच्या मॅचचाच विचार त्याच्या डोक्यात होता. शेवटी पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला.
सकाळी उठल्यावर देखील पुन्हा तीच ओपनिंगची भीती. अंघोळ करून तो ‘टीम ब्रेकफास्ट’ साठी गेला. काही खेळाडू नाश्ता करत होते, काही कॉफी घेत होतं. जवळपास सर्व खेळाडू आले होते. युवराजनेही आपला नाष्टा सुरू केला. गांगुली युवराजच्या एकदम समोर बसला होता, त्याने ओळखले की युवराज नर्वस आहे. तो तो म्हणाला,
“का रे युवी, पहिल्या मॅचचे टेन्शन आहे का?”
युवराजने नकारार्थी मान हलवली.
“मग असा का चेहरा पडलाय?”
गांगुलीने दुसरा प्रश्न केला. तेव्हा युवराजने उत्तर दिले,
“मॅचचे टेन्शन नाही पण ते ओपनिंग कधी केली नाही ना म्हणून..”
इतके बोलून युवराज थांबला. बाकीच्या खेळाडूंना काही समजेना. ते एकमेकाकडे पाहू लागले, कारण ओपनिंग तर सचिन आणि स्वतः गांगुली करत. दोघेही उत्तम फॉर्ममध्ये देखील होते, त्यामुळे जोडी बदलण्याचा प्रश्नच येत नव्हता.
युवराजच्या उत्तराने गांगुली मात्र हसायला लागला. बाकीच्या खेळाडूंना अजूनही कळायला मार्ग नव्हता की काय झाले आहे ? गांगुली युवराजला म्हणाला,
“तू ती गोष्ट सिरियसली घेतलीस? अरे, मी तुझी चेष्टा केली होती.”
त्यानंतर, गांगुलीने तिथेच डायनिंग टेबलवर, रात्री घडलेली घटना सांगितली आणि सगळे हसायला लागले. यामध्ये, युवराजचा मात्र पोपट झाला होता. सर्वांनी युवराजला गांगुलीच्या विनोदी स्वभावाविषयी सांगितले. शेवटी गांगुलीने युवराजला मिठी मारत रिलॅक्स केले.
पुढे ४०२ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला युवराज वनडेत केवळ २ डावांत व कसोटीतही २ डावांत सलामीला फलंदाजीला आला.
आजही, युवराज ही गोष्ट अनेक कार्यक्रमात सांगतो. पुढे सहा वर्षांनी, युवराजने देखील गांगुलीची अशीच मजा करून बदला घेतला.
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स लेखमालेतील अन्य लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ८: सायंकाळी द्रविडने प्रसादला फोन करत १५ वर्ष जुन्या पैजेची आठवण करून दिली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ६- २०१९ विश्वचषक उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये काय झाले?
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते