युवराज सिंगनं 2007 च्या टी 20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध मारलेले सलग 6 षटकार कोणाच्या लक्षात नसतील! अनेक क्रिकेटप्रेमींना आजही हा ऐतिहासिक क्षण जशाच्या तसा आठवतो. युवराजनं इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला लक्ष्य करत 6 षटकार ठोकले होते. युवीला हे कसं साध्य झालं याची कहानीही तितकीच रंजक आहे. (yuvraj singh 6 sixes story).
6 षटकार मारल्यानंतर अनेक वर्षांनी युवराजनं एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. युवीच्या मते, त्यानं रागाच्या भरात ही कामगिरी केली. एका षटकात 6 षटकार मारण्याचा युवराजचा कोणताही हेतू नव्हता. तुम्हाला जाणून धक्का बसेल, खरं तर युवराजला त्याचा गळा कापण्याची धमकी मिळाली होती. ज्यामुळे तो इतका संतप्त झाला की त्यानं आपला सर्व राग इंग्लंडच्या गोलंदाजावर काढला.
युवराजनं सांगितलं की, “मी अँड्र्यू फ्लिंटॉफला 2 चौकार मारले, जे त्याला आवडलं नाही. षटक पूर्ण झाल्यानंतर फ्लिंटॉफनं माझ्या शॉटला खराब म्हटलं. याशिवाय, त्यानं मला सांगितलं की तो माझा गळा कापेल. या घटनेपूर्वी 6 षटकार मारण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता.”
युवी पुढे म्हणाला की, “मग मी फ्लिंटॉफला सांगितलं की माझ्या हातात असलेल्या बॅटनं मी तुला कुठे मारू शकतो हे तुला माहीत आहे. मात्र दरम्यान पंचांची मध्यस्थी केली. यानंतर मी ठरवलं की आता प्रत्येक चेंडू फक्त बॉन्ड्रीपारच पाठवायचा. माझं नशीब चांगलं होतं की मी त्या दिवशी असं करू शकलो.”
त्या दिवशी युवराजनं डावाच्या 19व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडला लक्ष्य केलं. त्यानं ब्रॉडला एकामागून एक 6 षटकार ठोकले. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सहा षटकार मारणारा युवराज पहिला फलंदाज बनला. या कामगिरीसह युवराजनं केवळ 12 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रमही केला होता.
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडला 20 षटकात 218 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडचा 18 धावांनी पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास