आयपीएल 2024 संपल्यानंतर लगेचच टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 1 जून ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये आयोजित केली जाईल. स्पर्धेचं पूर्ण वेळापत्रक आधीच जाहीर झालंय. दोन दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आयसीसीनं जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्ट याला टी20 विश्वचषकाचं ॲम्बेसेडर बनवलं आहे. आता बातमी आली की, आयसीसीनं भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला देखील टी20 विश्वचषकाचं ॲम्बेसेडर घोषित केलंय.
टी20 विश्वचषकाला आता फक्त 36 दिवस उरले आहेत. त्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं दिग्गज भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला स्पर्धेचा ॲम्बेसेडर म्हणून घोषित केलं. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगनं एका षटकात 6 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचवेळी त्यानं भारताला विश्वचषक जिंकून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आयसीसीनं दिलेल्या या सन्मानानंतर युवराज सिंग म्हणाला की, “माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.” तो म्हणाला, “माझ्याकडे टी20 विश्वचषकातील काही चांगल्या आठवणी आहेत. यामध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचाही समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेचा भाग होणं खूप रोमांचक आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा असेल. त्याचा एक भाग होणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.”
युवराज पुढे बोलताना म्हणाला की, “न्यूयॉर्कमध्ये होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना यावर्षीच्या सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक असेल. त्यामुळे याचा भाग होणं आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंना नवीन स्टेडियममध्ये खेळताना पाहणं हा एक विशेष अधिकार आहे.”
यंदा टी20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत 9 ठिकाणी एकूण 55 सामने आयोजित केले जातील. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी 103 वर्षांचा आहे, पण म्हातारा नाही…”, भेटा महेंद्रसिंह धोनीचे ‘डाय हार्ड फॅन’ एस रामदास यांना
उसेन बोल्ट 2024 टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर, आयसीसीची मोठी घोषणा