भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला (yuvaraj singh) पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून (punjab and haryana high court) मोठा झटका बसला आहे. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमोल रतन सिंग यांच्या खंडपीठाने गुरुवारी (१७ फेब्रुवारी) जारी केलेल्या आदेशात युवराज सिंगने दाखल केलेली याचिका अंशत: फेटाळून लावली, ज्यामध्ये त्याने हंसी पोलीस ठाण्यात स्वत:वर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार युवराजवरील खटला या कायद्यान्वये सुरू राहणार असून त्यामधील कलम १५३ अ काढून टाकण्यात आले आहे.
रजत कलसन यांचे वकील अर्जुन शेओरन म्हणाले की, “न्यायालयाच्या आदेशानुसार युवराजविरुद्ध खटला चालणार आहे, त्यातून कलम १५३ अ हटवण्यात आले असून युवराजला दिलासा देण्यात आला आहे. भांग पिणाऱ्यांसाठी ‘भंगी’ हा शब्द वापरला जातो, हा युवराजचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला असून आता या प्रकरणी युवराजवर हिसारच्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. आता प्रत्येक हजेरीवेळी युवराजला न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.”
पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने युवराजच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात अगोदरच जामीन मंजूर केला होता. तो हंसी पोलिसांच्या तपासात सामील झाला होता. या प्रकरणी हांसी पोलिसांनी युवराजला अटक करून जामिनावर सोडले आहे. हंसी पोलीस आता युवराजविरुद्ध हिसारच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत.
युवराजचे सहकारी क्रिकेटपटू म्हणजेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज युझवेंद्र चहल यांच्यासोबत इंस्टाग्रामवर व्हिडिओ चॅटिंग करताना युवराज अनुसूचित जाती समाजाबद्दल अपमानास्पद बोलला होता आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हांसी येथील दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवराज विरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल केला आणि तोच गुन्हा फेटाळण्यासाठी युवराजने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तक्रारदार रजत कलसन यांनी युवराज सिंग व्यतिरिक्त तारक मेहता का उल्टा चष्मा यामधील अभिनेत्री मुनमुन दत्ता उर्फ बबिता जी आणि बॉलीवूड अभिनेत्री युविका चौधरी यांच्या विरोधात सुद्धा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्या दोघांनी सुद्धा सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून अनुसूचित जाती समाजाप्रती अपमानास्पद वक्तव्य केले होते, त्यासाठी त्या दोघींना पोलीस तपासात सहभागी व्हावे लागले. नंतर पोलिसांनी त्यांना रीतसर अटक करून जामिनवर सोडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा
‘जल्दी जा, दात मत दिखा उसको’, पोलार्डवर हसत असलेल्या चहलवर भडकला कर्णधार रोहित- Video