इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या चौदाव्या हंगामाचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार आहे. यासाठी २९२ खेळाडूंची नावे अंतिम केली गेली आहेत. ज्यामध्ये १० खेळाडूंची आधारभूत किंमत २ कोटी इतकी आहे. या १० खेळाडूंमध्ये केवळ हरभजन सिंग आणि केदार जाधव हे दोन भारतीय समाविष्ट आहेत. यावेळच्या लिलावात एखादा खेळाडू आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली मिळवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याची नोंद आहे.
आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता युवराज
भारताच्या दोन विश्वविजयांचा शिल्पकार असलेला माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू आयपीएलचा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. युवराजवर २०१५ सालच्या आयपीएल हंगामावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला १६ कोटी इतकी मोठी किंमत देऊन आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. तो हंगाम युवराजसाठी तितकासा लाभदायी ठरला नाही. युवराजने संपूर्ण हंगामात १४ सामने खेळताना २४८ धावा व अवघा एक बळी मिळविला होता.
विशेष म्हणजे यापूर्वी देखील सर्वाधिक महागडा खेळाडू होण्याचा मान त्याच्याच नावे होता. साल २०१४ च्या आयपीएल लिलावावेळी विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला १४ कोटी इतकी रक्कम दिली होती.
कमिन्स आला होता युवराजच्या जवळ
मागील सहा वर्षांपासून युवराजचा सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून विक्रम अबाधित आहे. मात्र, सन २०२० च्या आयपीएल हंगामावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स युवराजचा हा ‘सर्वाधिक महागडा खेळाडू’ हा खिताब मिळवण्याचा अगदी जवळ आला होता. मात्र, १५.५० कोटी रुपयांना खरेदी करत कोलकत्ता नाइट रायडर्सने त्याचा हिरमोड केला. तरीही, कमिन्स आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू बनण्यात यशस्वी ठरला.
हे खेळाडू मोडू शकतात युवराजचा विक्रम
आयपीएल २०२१ च्या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. सर्वच खेळाडूंना एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत असल्याने, त्याची बोली युवराजपेक्षा अधिक जाऊ शकते. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा अनुभवी स्टीव्ह स्मिथ व आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हे देखील या लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. मार्नस लॅब्यूशेन कायले जेमिसन, डेव्हिड मलान व जाय रीचर्डसन हे मोठी बोली घेऊन प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई कसोटीत भारताचा विजय पक्का! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही तसेच म्हणाल
इसके मुंह पर भी डाल सकता है..! चेन्नई कसोटीतील पंतची कॉमेंट्री तूफान व्हायरल, बघा व्हिडिओ
अजब योगायोग ! सिराजच्या ‘त्या’ कृतीने करून दिली सहा वर्षांपूर्वीच्या रैनाची आठवण