मुंबई | भारताचा माजी धडाकेबाज अष्टपैलू युवराज सिंग याने युजवेंद्र चहलच्या व्हिडिओवर जातीवाचक टिप्पणी केली होती. यावर हरियाणातले वकील राज्यात कल्सन यांनी युवराज सिंग विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाविषयी युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून आज माफी मागितली आहे.
युवराज सिंगने ट्विटमध्ये लिहिले की, ” मी कोणत्याही प्रकारच्या भेदभाववर विश्वास ठेवत नाही. लोकांच्या कल्याणात मी माझं जीवन जगत आहे. मी माझ्या मित्रांशी बोलत होतो, तेव्हा माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. एक जबाबदार भारतीय नागरिक या नात्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो आणि त्यांची जाहीररित्या माफी मागतो. देश आणि देशातील लोकांवर माझे कायमचे प्रेम राहील.”
याबाबत अधिक माहिती अशी की, लॉकडाऊनच्या काळात युजवेंद्र चहल अनेक गमतीशीर व्हिडिओ बनवत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी युवराज आणि रोहित सोशल मीडियावर लाइव्ह संवाद साधत होते. दोन्ही खेळाडू क्रिकेट आणि कोरोना सारख्या मुद्यांवर चर्चा करत होते. या चर्चेत त्यांनी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यावरही चर्चा केली, तेव्हा युवीने युजवेंद्रच्या एका व्हिडिओवर जातीवाचक शब्दांचा वापर केला. त्यानंतर ट्विटरवर, युवराजसिंग माफी मागावी असा ट्रेंड सुरू झाला.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1268810700429897728
या प्रकरणाविषयी पोलीस अधीक्षक लोकेंद्र सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “या प्रकरणाविषयी 2 मे रोजी तक्रार आली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत पण अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यासंबंधी कोणत्याही प्रकारचा एफआयआर आतापर्यंत दाखल केला गेला नाही.”