भारतीय संघाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या भारतीय संघाचा भाग नसला तरी, तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर नाही. चहल महिनाभराच्या कालावधीपासून इंग्लंडमध्ये असून, तेथील काऊंटी क्रिकेटमध्ये भाग घेत आहे. चहल तिथेही चांगली कामगिरी करताना दिसतोय. चहल हा काउंटी चॅम्पियनशिपमधील नॉर्थम्प्टनशायर संघाचा भाग असून, डर्बीशायरविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी केली
नॉर्थम्प्टनशायर आणि डर्बीशायर यांच्यातील सामना सोमवार 9 सप्टेंबरपासून सुरू झाला. यादरम्यान डर्बीशायर संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र, चहलच्या भेदक गोलंदाजीसमोर संघाला फारशी धावसंख्या करता आली नाही. संघ नियमित अंतराने आपल्या विकेट्स गमावत राहिला आणि 99 धावांपर्यंत 4 विकेट पडल्या. लुईस रीसने संघाकडून सर्वाधिक 50 धावा केल्या. वेन मॅडसेननेही 47 धावांची खेळी केली. मात्र, उर्वरित फलंदाजांना तेवढी मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे संघ केवळ 165 धावांवरच मर्यादित राहिला. चहलने शानदार गोलंदाजी करत अवघ्या 45 धावांत 5 बळी घेतले.
आणखी एक भारतीय खेळाडू पृथ्वी शॉ देखील नॉर्थम्प्टनशायरकडून खेळत आहे. मात्र, पहिल्या डावात तो फ्लॉप झाला. नॉर्थम्प्टनशायरचा संघ फलंदाजीला आला तेव्हा पृथ्वी शॉ केवळ 2 धावा करून बाद झाला. त्याने 8 चेंडूंचा सामना केला. मात्र, दुसऱ्या डावात त्याला आणखी एक संधी मिळेल. चॅम्पियनशिपमध्ये पृथ्वी शॉची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र आहे.
चहल गेल्या वर्षभरापासून भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. टी20 विश्वचषकासाठी संघात त्याची निवड झाली होती. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आले नाही. तो संपूर्ण स्पर्धेत बाकावर बसला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळलेला. आता त्याची बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड होते की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा-
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन बनला संघमालक, खरेदी केला ‘या’ टीमचा हिस्सा