भारतीय संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानने ( Zaheer Khan ) त्याच्या कारकिर्दीत संघासाठी अनेकदा मोलाचे योगदान दिले. त्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिलेला. झहीरनंतर अनेक वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि अजूनही नवीन खेळाडू येतच आहेत. आता याच पार्श्वभूमीवर झहीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. झहीरच्या मते भारतची क्रिकेटची सिस्टिम एवढी अप्रतिम आहे की, यामधून एकापेक्षा एक चांगले खेळाडू बाहेर येत आहेत. भारतीय संघाची ही सिस्टिम एका कारखान्यासारखी आहे, असे झहीर म्हटला.
भारतीय संघ मागच्या अनेक वर्षांपासून एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. संघ जवळपास सर्वच मालिकांमध्ये आणि आयसीसी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करताना दिसून येतो. अशात झहीरच्या मते या सर्व गोष्टी अनेक प्रतिभावान खेळाडूंच्या जोरावर साध्य झाल्या आहेत. झहीरच्या मते भारतीय संघ कोणत्याही मोठ्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अ संघाची एक दौरा होत असतो. त्यामुळेच संघासमोर अनेक पर्याय उपलब्ध होतात.
भारतीय संघाकडे गुणवंत खेळाडूंची कमतरता नाही
झहीर खान एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलत होता. तो यावेळी म्हटला की, “भारतीय संघ जी गुणवत्ता तयार करत आहे, ती कारखान्यासारखी आहे. आता गुणवंत खेळाडूंची काहीच कमतरता नाही राहिली. ही सिस्टीम सतत खेळाडूंना तयार करत आहे. तसेच अनेक खेळाडू वाट पाहत आहेत, जे कधीही खेळण्यासाठी तयार राहतात. भारताकडे दुसऱ्या संघांपेक्षा ही एक जमेची बाजू आहे. भारत अ (India A) आणि १९ वर्षाखालील संघांच्या दौऱ्यांमूळे खेळाडूंना वाव मिळतो. त्यामुळे तुम्हाला आधीपासून तयार असलेले खेळाडू मिळतात आणि त्याचा संघाला खूप फायदा होतो.
दरम्यान, सोमवारी (६ डिसेंबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना संपला. भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडला ३७२ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने सामन्याच्या दुसऱ्या डावात ७ विकेट्सच्या नुकसानावर २७६ धावा करून डाव घोषित केला. भारतीय संघ सामन्याच्या सुरुवातीपासून आघाडीवर असल्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी ५४० धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १६७ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर आटोपला होता. या विजयासोबत भारतीय संघाने १-० अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली. न्यूझीलंडने कसोटी मालिकेपूर्वी टी-२० मालिकेत देखील ३-० असा पराभव पत्करला असून, त्यांना भारत दौऱ्यावर एकही सामना जिंकता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार युवराज सिंग! व्हिडिओ शेअर करत म्हणे, ‘दुसऱ्या इनिंगची वेळ आलीय’
नोव्हेंबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन, एकाही भारतीयाचं मात्र नाव नाही
फक्त फिल्डिंगला आला आणि ‘एक लाख’ जिंकून गेला! मुंबई कसोटीत घडली अनोखी घटना






