इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. दरम्यान, या सामन्यादरम्यान बुमराह आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये काहीप्रमाणात बाचाबाची झाल्याचेही दिसले. याबद्दल आता भारताचा माजी क्रिकेटपटू झहिर खानने प्रतिक्रिया दिली आहे.
बुमराहची शमीसह महत्त्वपूर्ण भागीदारी
लॉर्ड्स कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र, याचवेळी भारताकडून दुसऱ्या डावात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी तळातल्या फळीत फलंदाजीला येत कमाल केली होती. या दोघांनी ९ व्या विकेटसाठी ८९ धावांची नाबाद भागीदारी केली होती. ज्यामुळे भारताला इंग्लंडसमोर २७२ धावांचे मोठे आव्हान उभे करता आले होते. बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या होत्या, तर शमीने नाबाद ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
दरम्यान, या सामन्यात बुमराह आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. प्रामुख्याने त्याची बाचाबाची जेम्स अँडरसन आणि जोस बटलरसह झाली होती. याबद्दल बोलताना झहिर खान म्हणाला आहे की जर राग आल्यानंतर बुमराह चांगली कामगिरी करणार असेल, तर त्याला असा राग आला पाहिजे.
“तर त्याला असा राग आला पाहिजे”
झहिर खान क्रिकबजशी बोलताना म्हणाला, ‘जसप्रीत बुमराह जर राग आल्यानंतर आशाप्रकारे मैदानात प्रदर्शन करणार असेल, तर त्याने कधी-कधी असा पंगा घ्यायला हवा. पहिल्या डावात त्याने एकही विकेट घेतली नव्हती. बुमराह ज्याप्रकारचा गोलंदाज आहे, त्यानुसार त्याला ही गोष्ट खटकली असले. त्यानंतर अँडरसनबरोबर त्याची शाब्दिक चकमक झाली आणि इंग्लंडचे सगळे खेळाडू ज्याप्रकारे त्याच्यावर तुटून पडले, तर या गोष्टी तुम्हाला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देतात. त्यानेही आपल्या रागाचा उपयोग चांगल्या प्रकारे केला.’
याबरोबर बुमराहने दुसऱ्या डावात केलेल्या शानदार गोलंदाजीबद्दल झहिर म्हणाला, ‘जसप्रीत बुमराहने ज्याप्रकारे स्लोअर चेंडूवर ऑली रॉबिन्सनला बाद केले, ते कमाल होते. उजव्या हाताच्या फलंदाजाला राऊंड द विकेटद्वारे पायचीत करणे सोपे नाही. पण, बुमराहने क्रिजच्या जवळून स्लोअर चेंडू फेकला आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळाली.’
बुमराहने घेतल्या ३ महत्त्वाच्या विकेट्स
लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटची महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. तसेच त्याने सलामीवीर रॉरी बर्न्सची आणि रॉबिन्सनची देखील विकेट घेतली होती.
या सामन्यात २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था दुसऱ्या डावात ७ बाद ९० धावा अशी झाली होती. त्यावेळी सामन्यांतील जवळपास २० षटके बाकी होती. अशा कठीण परिस्थितीत रॉबिन्सनने जोस बटलरला भक्कम साथ दिली होती. पण ५१ व्या षटकात बुमराहने रॉबिन्सनचा अडथळा दूर केला. त्यानंतर ५२ व्या षटकात मोहम्मद सिराजने बटलर आणि जेम्स अँडरसन या दोघांनाही बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
माजी इंग्लिश क्रिकेटपटूनेच सांगितली रूटला बाद करण्याची योजना, म्हणाला…
कोलकातासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ खेळाडू आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात करू शकतो जोरदार पुनरागमन





