ZIM vs IRE 1st T20I: आयर्लंड क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याला गुरुवारपासून (दि. 7 डिसेंबर) टी20 मालिकेने सुरुवात झाली. हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्याचा निकाल अखेरच्या चेंडूवर निघाला. झिम्बाब्वेचा अखेरच्या चेंडूवर 1 विकेटने विजय झाला. या सामन्याचा हिरो कर्णधार सिकंदर रझा झाला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकत यजमान झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, पाहुण्या आयर्लंड (Ireland) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 147 धावा केल्या होत्या. आयर्लंडच्या 8 विकेट्सपैकी 3 विकेट्स या झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा (Sikandar Raza) याने घेतल्या होत्या. त्यानंतर 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने रझाच्या सर्वाधिक 65 धावांच्या खेळीने अखेरच्या चेंडूवर 1 विकेटने विजय मिळवला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.
झिम्बाब्वेचा मायदेशातील हा पहिलाच सामना होता, जो फ्लड लाईट्समध्ये खेळला गेला. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल नव्हती. कारण, खेळपट्टीवर भेगा पडल्या होत्या. त्यामुळे हा सामना कमी धावसंख्येचा राहिला. सिकंदर रझा सोडला, तर दोन्ही संघाच्या कोणत्याही फलंदाजाला फलंदाजीत कमाल करता आली नाही.
आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून कर्णधार रझाने 42 चेंडूत सर्वाधिक 65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 5 चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त वेसली मधेवेरेने 25, तर क्लाईव्ह मडांडेने 20 धावा केल्या. इतर एकही फलंदाज 15 धावांचा आकडा गाठू शकला नाही. मात्र, अखेरच्या षटकात संघाला विजयासाठी 9 धावांची गरज होती. यावेळी रिचर्ड नगारवाने चौथ्या चेंडूवर चौकार मारत सामना झिम्बाब्वेच्या बाजूने झुकवला. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेला विजयासाठी 2 धावांची गरज होती. तसेच, आयर्लंडलाही विजयासाठी 1 विकेट पाहिजे होती. त्यावेळी ब्लेसिंग मुझरबानीने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावत 2 धावा केल्या. तसेच, संघाला 1 विकेटने विजय मिळवून दिला.
आयर्लंडकडून यावेळी चार गोलंदाजांनी प्रत्येकी 2, तर जॉर्ज डॉकरेलने 1 विकेट घेतली.
आयर्लंडने केल्या 147 धावा
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाकडून सलामीवीर अँड्र्यू बालबर्नी याने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 30 धावांचा आकडा गाठू शकला नाही. गेरेथ डेलेनीने नाबाद 26 धावा केल्या, तर हॅरी टेक्टर 24 आणि लॉर्कन टकर 21 धावा करून बाद झाले.
यावेळी झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना सिकंदर रझा चमकला. त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 28 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नगारवा आणि मुझरबानीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, सीन विलियम्सनने 1 विकेट घेतली. (zimbabwe vs ireland 1st t20i thrilling battle between zim vs ire match decided on the last sikandar raza hero read)
हेही वाचा-
धक्कादायक! CWC 23मधील फायनलसह ICCने ‘या’ 5 सामन्यांतील खेळपट्ट्यांना दिली सरासरी रेटिंग, कोणत्या ते घ्या जाणून
‘Animal’मुळे देशभरात चर्चेत असलेल्या अभिनेत्रीने सांगितले आवडत्या क्रिकेटपटूचे नाव, तुम्हीच पाहा