गोवा – इंडियन सुपर लीगमधील ( आयएसएल ) एससी ईस्ट बंगालचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. ओदिशा एफसीविरुद्धच्या लढतीत ईस्ट बंगालने ०-१ पिछाडीवरून मुसंडी मारली खरी, परंतु त्यांना फारकाळ ओदिशाचे आक्रमण थोपवता आले नाही. ओदिशाकडून जॉनथस क्रिस्टियन ( २३ मि.) व झेव्हियर हर्नांडेझ ( ७५ मि. ) यांनी गोल केले, तर ईस्ट बंगालकडून अँटोनियो पेरोसेव्हिच ( ६४ मि) याच्या प्रयत्नांना यश आले. ओदिशाने २-१ अशा विजयानंतर २१ गुणांसह ६व्या क्रमांकावर झेप घेतली.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी ओदिशा एफसी आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यात तुल्यबळ खेळ झाला. पहिल्याच मिनिटाला ओदिशाकडून आक्रमण झाला खरा, परंतु त्यानंतर ईस्ट बंगालने बचावफळी मजबूत केली. ओदिशाचे आक्रमण ते सुरेख रित्या परतवून लावत होते. २३व्या मिनिटाला अप्रतिम रणनीती आखून ओदिशाने ही बचावफळी भेदली. झेव्हियर हर्नांडेझने पेनल्टी बॉक्समधील ईस्ट बंगालच्या ५ बचावपटूंना चकवून जॉनथस क्रिस्टियनकडे सोपवला आणि जॉनथसने कोणतीच चूक न करता चेंडू गोलजाळीत पाठवून ओदिशाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीनंतर ईस्ट बंगालने बचावात्मक खेळावर भर दिला. त्यांच्याकडून दोन प्रयत्न झाले, परंतु तेही ऑफ साईट राहिले. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये ओदिशाने १-० अशा आघाडीसह वर्चस्व गाजवले.
मध्यंतरात ईस्ट बंगालने सुरुवातीपासून आक्रमणाला सुरुवात केली आणि ४९व्या मिनिटाला फ्री किकही कमावली. पण, स्टार खेळाडू डॅरेन सिडोएल याचा हा प्रयत्न गोलपोस्टच्या वरून गेला. ५९व्या मिनिटाला अँटोनियो पेरोसेव्हिचला वन ऑन वन संधी मिळाली होती, पण त्याने घाई केली आणि चेंडू गोलपोस्टवरून गेला. ईस्ट बंगालने इथे पुन्हा बरोबरीची संधी गमावली. सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पेरोसेव्हिचला ६४व्या मिनिटाला अखेर यश आले. ईस्ट बंगालने या गोलआधी संघात तीन बदल केले आणि त्यांनी लगेच निकाल मिळाला. मधल्याफळीत कमालीचा वेग आला आणि त्याच जोरावर मिळालेल्या पासवर पेरोसेव्हिचने पेनल्टी बॉक्समध्ये ओदिशाच्या तीन बचावपटूंसह गोलरक्षकाला चकवून अप्रतिम गोल केला.
१० मिनिटांत ओदिशाकडून हल्लाबोल झाला. जॉनथस आणि झेव्हियर याच जोडीने पुन्हा कमाल केली. पण, यावेळेस गोल करणारा खेळाडू बदलला. जॉनथसने ईस्ट बंगालच्या बचावपटूंना चकवून चेंडू पेनल्टी बॉक्समध्ये घेऊन गेला. सर्व बचावपटू आपल्याकडे वळलेत याचा अंदाज येताच त्याने तो झेव्हियरकडे पास केला आणि त्याने कोणतीच चूक न करता ओदिशासाठी आघाडीचा गोल केला. ७८व्या मिनिटाला जॉनथस आणखी एक गोल करण्यासाठी पुढे सरसावला अन् चेंडू गोलजाळीच्या दिशेने टोलवला. पण, गोलरक्षक शंकर रॉयने चेंडू अडवला. ८२व्या मिनिटाला हर्नांडेझने गोलजाळीत पाठवलेला चेंडू अगदी अखेरच्या क्षणाला हिरा मोंडलने माघारी पाठवला आणि त्याच्या सुरेख बचावाने ओदिशाला मोठा धक्का दिला. ओदिशाने ही आघाडी कायम राखताना २-१ असा विजय निश्चित केला.
निकाल – ओदिशा एफसी २ ( जॉनथस क्रिस्टियन २३ मि., झेव्हियर हर्नांडेझ ७५ मि. ) विजयी विरुद्ध एससी ईस्ट बंगाल १ ( अँटोनियो पेरोसेव्हिच ६४ मि.)
महत्त्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी ८: बेंगाल वॉरियर्स वि. तेलुगू टायटन्स संघातील चुरशीची लढत संपली बरोबरीत
पोलार्डच्या ‘त्या’ प्रश्नावर सूर्यकुमारने का बाळगले मौन?
प्रो कबड्डी लीगच्या १००व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सची बाजी, गुजरात जायंट्सवर ५ गुणांनी विजय