आयसीसी विश्वचषकाच्या (icc world cup) इतिहासातील भारत (team india) हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत. १९८३ आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात अनेक महान खेळाडू होते. या दोन्ही संघांमधील ताळमेळ हा अप्रतिम होता. या भारतीय संघांमध्ये काही खास कमतरता नसल्यामुळे विरोधी संघ त्यांच्यापुढे आव्हान उभे करू शकले नव्हते.
भारताने १९८३ मध्ये पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर तब्बल २८ वर्षांनी त्यांचा दुसरा विश्वचषक जिंकला आणि हे दोन्ही विश्वचषक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण या लेखात भारताच्या दोन्ही विश्वचषक विजेत्या संघांचा आढावा घेणार आहोत आणि त्यांतील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ तयार करणार आहोत.
१९८३ आणि २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची एकत्रित सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हन
सलामीवीर – सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग
यात काहीच शंका नाही सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू आहे. सचिनच्या नावावर विश्वचषकात देखील अनेक विक्रम आहेत. २०११ विश्वचषकात सचिनचे वय ३७ वर्ष होते, तरीही त्याने अप्रतिम खेळी करून दाखवली आहे. सचिन २०११ विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने विश्वचषकात इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतक देखील ठोकले होते.
विरेंद्र सेहवाग भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. सेहवाग भारताच्या डावाची सुरुवात करताना विरोधी संघाच्या गोलंदाजाचे मनोबल कमकूवत करण्याचे काम करायचा. तो आक्रमक अंदाजात संघाचे रन रेट वाढवण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत असे. विश्वचषक विजेत्या दोन संघातील संयुक्त प्लेईंग इलेव्हनमध्ये सेहवागने त्याच्या प्रदर्शनाच्या जोराबर सुनील गावसकरांना देखील मागे सोडले.
मध्यक्रम – एमएस धोनी, मोहिंदर अमरनाथ आणि गौतम गंभीर –
गौतम गंभीरने प्रामुख्याने भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. परंतु विश्वचषकात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने संघासाठी सर्वात जास्त धावा केल्या होत्या. भारतला या विश्वचषकात मिळालेल्या विजयात गौतम गंभीरची भूमिका सर्वात महत्वाची होती.
१९८३ विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाच्या मोहिंदर अमरनाथ यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांनी या विश्वचषकातील महत्वाच्या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. १९८३ विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात अमरनाथ याच्या प्रदर्शनासाठी त्यांना सामनावीर निवडले गेले होते.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी एक महान क्रिकेटपटू आहे. धोनीच्या कर्णधारपदात भारतीय संघाने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या. २०११ विश्वचषकाच्या विजयात देखील धोनीचे योगदान बहुमूल्य होते. २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने दबावाच्या परिस्थितीत अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि संघाला विजय मिळवून दिला होता.
अष्टपैलू – कपिल देव, युवराज सिंग आणि रॉजर बिन्नी
२०११ विश्वचषकात युवराज सिंगला त्याच्या प्रदर्शनासाठी मॅन ऑफ द टूर्नामेंट निवडले गेले होते. या विश्वचषकात युवराजने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले होते. त्याने अनेकदा महत्वाची फलंदाजी केली आणि वेळोवेळी संघाला विकेट्स देखील मिळवून दिल्या.
१९८३ विश्वचषकात दिग्गज कपिल देव यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या विश्वचषकात त्यांनी जिम्बाब्वे संघाविरुद्ध १७५ धावांची महत्वाची खेळी केली होती. त्यांच्या प्रदर्शनामुळे संपूर्ण भारतीय संघाचे मनोबल वाढले होते. फलंदाजी आणि गोलंदाजीव्यतिरिक्त अंतिम सामन्यात त्यांनी वीवीएस रिचर्ड्सचा घेतलेला झेल चाहत्यांच्या नेहमीच स्मरणात राहील.
रॉजर बिन्नी भारतीय संघाचे एक अंडरेटेड अष्टपैलू होते. परंतु त्यांनी १९८३ विश्वचषकात केलेले प्रदर्शन चाहते कधीच विसरू शकत नाहीत. त्यांनी या विश्वचषकादरम्यान १८ विकेट्स घेतल्या होत्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले होते.
गोलंदाज – मदन लाल, हरभजन सिंग आणि जहीर खान
१९८३ विश्वचषकात भारताला जेतेपद मिळवून देण्यासाठी मदन लाल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. अंतिम सामन्यात त्यांनी वीवीएन रिचर्ड्सची महत्वाची विकेट घेतली होती. या विश्वचषकात ते तिसरे सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले होते.
२०११ विश्वचषकात हरभजन सिंग भारताचा सर्वोत्तम फिरगी गोलंदाज ठरला. हरभजनन भारतीय संघासाठी मधल्या षटकांतील उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. जर त्याला सामन्यात विकेट्स घेता आल्या नाही, तर तो धावाही खर्च करत नव्हता.
जहीर खान भारताच्या इतिहासातील एक सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. जहीर २०११ विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने २०११ विश्वचषकात एकून २१ विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या होत्या. त्याच्या विश्वचषकातील एकंदरीत प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने विश्वचषकाच्या इतिहासात एकूण ४४ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
जुनी आठवण! १८ वर्षांच्या ‘यंग भज्जी’ला गोलंदाजी करताना पाहिलंय का? पाहा हा व्हिडिओ
एकवेळ वाटलेलं कधी कसोटी खेळायलाही मिळणार नाही, आता तोच बनलाय भारताचा उपकर्णधार
व्हिडिओ पाहा –