चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर तब्बल ४२० धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर १ विकेट गमावून ३९ धावा केल्या असल्याने मंगळवारी (९ फेब्रुवारी) त्यांच्यासमोर उर्वरित ३८१ धावा करण्याचं आव्हान असणार आहे.
भारतीय संघासमोरील हे आव्हान पाहून अनेकांना हा सामना इंग्लंडच्या पारड्यात जाऊ शकतो किंवा सामना अनिर्णित राहु शकतो अशा शक्यता अधिक वाटत आहेत. पण असे असले तरी हे ४२० धावांचे आव्हान यशस्वी पार करणे तशी अशक्य गोष्ट नाही. याआधीही भारताने अनेकदा अशक्य वाटणारे विजय मिळवले आहेत. १२ वर्षांपूर्वीही चेन्नईमध्येच इंग्लंड संघाविरुद्ध भारताने चौथ्या डावात ३८७ धावांचे आव्हान यशस्वी पार केले होते.
आठवण २००८ चेन्नई कसोटीची
इंग्लंडचा संघ जेव्हा २००८ साली भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा या दौऱ्यातील एक कसोटी सामना चेन्नई येथे झाला होता. त्या सामन्यात जवळपास चौथ्या दिवसापर्यंत इंग्लंडचे पारडे जड असल्याचे वाटत होते. मात्र, भारतीय फलंदाजांनी कमाल करत हा सामना भारताला जिंकून दिला होता.
त्या सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडने ३१६ धावा केल्या होत्या. यात अँड्र्यू स्ट्रॉसच्या(१२३) शतकाचा समावेश होता. त्यानंतर इंग्लंडने भारताला २४१ धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. त्यावेळी अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि मॉन्टी पानेसरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. तर भारताकडून त्या सामन्यात केवळ तात्कालिन कर्णधार एमएस धोनीला अर्धशतकी खेळी करता आली होती. इंग्लंडने पहिल्या डावात ७५ धावांची आघाडी घेतली होती.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावातही अँड्र्यू स्ट्रॉसने शतकी खेळी केली. त्याने १०८ धावा केल्या. त्याच्यासह पॉल कॉलिंगहूडनेही १०८ धावांची शतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने दुसरा डाव ९ बाद ३११ धावांवर घोषित केला आणि भारताला ३८७ धावांचे मोठे आव्हान दिले. अनेकांना हे आव्हान पाहून आता भारतीय संघ एकतर पराभूत होईल किंवा सामना अनिर्णित राहाणार असे वाटले होते.
मात्र, भारताकडून सलामीवीर गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागने शानदार सुरुवात केली. त्यांनी चौथ्या दिवसाखेरपर्यंत भारताला १०० धावांचा आकडाही पार करुन दिला होता. सेहवागने आक्रमक खेळताना केवळ ६८ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांची बरसात करत ८३ धावा केल्या होत्या. त्याला दुसऱ्या बाजूने गंभीरने भक्कम साथ दिली होती. सेहवागच्या या आक्रमणामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. सेहवाग आणि गंभीरमध्ये ११७ धावांची भागीदारी झाली होती.
सेहवागचे हे आक्रमण अखेर चौथा दिवस संपण्याआधी ग्रॅमी स्वानने थांबवले. त्याने सेहवागला पायचीत केले. पण त्यानंतरही पाचव्या दिवशी गंभीरने(६६) अर्धशतक पूर्ण केले. तसेच सचिन तेंडुलकरने शतकी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्याला युवराज सिंगने तोलामोलाची साथ दिली. सचिन आणि युवराजमध्ये १६३ धावांची नाबाद भागीदारी झाली. त्यांच्या या भागीदारीने भारताच्या विजयाचा कळस चढवला. सचिनने नाबाद १०९ आणि युवराजने नाबाद ८५ धावांची खेळी केली.
भारताने चौथ्या डावात अशक्य वाटणारे ३८७ धावांचे आव्हान केवळ ४ गडी गमावत पूर्ण केले होते आणि इतिहास रचला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅन आऊट ‘हा’ सलामीवीर इन! रोहित शर्माच्या फ्लॉप शोमुळे क्रिकेट रसिकांनी केली मागणी
रोहित शर्मा ते विराट कोहली: कसोटी क्रिकेटमध्ये पार्ट-टाइम गोलंदाजी करणारे ५ भारतीय क्रिकेटपटू
‘हा’ भारतीय खेळाडू सर्वाधिक दुर्लक्षित नायक, मोहम्मद कैफने मांडले परखड मत






