नुकतेच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. जवळपास एक वर्ष झाले धोनीने आणि २ वर्षे झाले रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नव्हता. मात्र, पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून हे दोन्ही दिग्गज भारतीय संघात पुनरागमन करतील आणि त्यानंतर निवृत्ती घेतील, अशी सर्वांना आशा वाटत होती.
धोनी आणि रैनाच्या निवृत्तीनंतर क्रिकेट क्षेत्रातूनच नाही तर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही धोनीच्या निवृत्तीबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. सोरेन यांनी बीसीसीआयकडे धोनीला एक निवृत्तीचा सामना खेळू (फेअरवेल मॅच) देण्याची मागणी केली आहे.
धोनीप्रमाणे रैनानेही त्याचा निवृत्तीचा सामना न खेळताच निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे, असं नाही. यापुर्वीही बऱ्याच भारतीय दिग्गजांना त्यांचा निवृत्तीचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. काही कारणांमुळे त्यांना संघातून बाहेर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी काही वर्षे पुनरागमनाची वाट पाहिली. परंतु, संधी न मिळाल्यामुळे त्या भारतीय दिग्गजांनी निवृत्तीचा सामना न खेळता निवृत्तीची घोषणा केली.
या लेखात, त्या पाच भारतीय दिग्गजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी निवृत्तीचा सामना न खेळता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. (5 Indian Legends Who Retired Without Farewell Match) –
व्हिव्हिएस लक्ष्मण –
भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणच्या कामगिरीची आजही आठवण काढली जाते. नोव्हेंबर १९९६ला दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लक्ष्मणने २००१मध्ये कोलकाता येथील कसोटी सामन्यात ऐतिहासिक खेळी केली होती. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २८१ धावांची दमदार खेळी केली होती. ती लक्ष्मणच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी मानली जाते.
लक्ष्मणने भारताकडून १३४ कसोटी सामने खेळत ८७८१ धावा आणि ८६ वनडे सामने खेळत २३३८ धावा केल्या होत्या. २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने जवळपास ६ महिने वाट पाहिली आणि १८ ऑगस्ट २०१२ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे लक्ष्मणला त्याचा निवृत्तीचा सामना खेळायला मिळाला नाही.
युवराज सिंग –
‘सिक्सर किंग’ म्हणून संबोधला जाणारा भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगलाही त्याचा निवृत्तीचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २००७ सालच्या टी२० विश्वचषक आणि २०११ सालच्या वनडे विश्वचषकात युवराजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याने भारताकडून ३०४ वनडे सामन्यात १४ शतकांच्या मदतीने ८७०१ धावा केल्या होत्या. तर, ५८ टी२० सामन्यात ११७७ धावा आणि ४० कसोटी सामन्यात १९०० धावा केल्या होत्या.
जून २०१७मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा वनडे सामना खेळल्यानंतर युवराजला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. २०१९सालच्या विश्वचषकात आपल्याला पुनरागमनाची संधी मिळेल, असे युवराजला वाटत होते. पण, दुर्दैवाने त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे युवराजने १० जून २०१९ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
विरेंद्र सेहवाग –
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांची वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर नोंदलेला आहे. २००८मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने सर्वोत्कृष्ट ३१९ धावांची खेळी केली होती. भारताकडून १४ वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या सेहवागने मार्च २०१३ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
त्यानंतर सेहवागने तब्बल २ वर्षे पुनरागमनाची वाट पाहिली. पण, दुर्दैवाने त्याला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने २० ऑक्टोबर २०१५ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. म्हणून सेहवागलाही त्याचा सेंड ऑफ (निवृत्तीचा सामना) सामना खेळण्याचे भाग्य प्राप्त झाले नाही. पण, त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयने दिल्लीतील फिरोजशाह कोहला स्टेडियमवर त्याला स्पिच देण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी सेहवागचा त्याच्या उपलब्धीसाठी ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला होता.
झहीर खान –
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानलाही निवृत्तीचा सामना खेळण्याचे भाग्य प्राप्त झाले नाही. २०११ सालच्या वनडे विश्वचषकात झहीरने भारताकडून २१ विकेट्स चटकवण्याचा कारनामा केला होता. त्यावेळी विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज बनला होता.
भारताकडून ९२ कसोटी सामन्यात ३११ विकेट्स, २०० वनडे सामन्यात २८२ विकेट्स आणि १७ टी२० सामन्यात १७ विकेट्स घेण्याचा कारनामा झहीरने केला होता. फेब्रुवारी २०१४ला न्यूझीलंडविरुद्ध झहीरने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर पुनरागमनाची शक्यता न दिसल्याने झहीरने १५ ऑक्टोबर २०१५ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
गौतम गंभीर –
२०११ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकाविरुद्ध ९७ धावांची खेळी करणाऱ्या गौतम गंभीरलाही त्याचा निवृत्तीचा सामना खेळायला मिळाला नाही. नोव्हेंबर २०१६ला इंग्लंडविरुद्धचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर गंभीरने जवळपास २ वर्षे पुनरागमनाची वाट पाहिली. पण, पुनरागमनाची संधी न मिळाल्यामुळे ३ डिसेंबर २०१८ला गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
१३ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत गंभीरने एकूण २० शतके केली होती. यात त्याच्या वनडेतील ११ आणि कसोटीतील ९ शतकांचा समावेश होता.
ट्रेंडिंग लेख –
शेवटच्या चेंडूवर ६ धावा हव्या असताना खणखणीत षटकार मारणारे २ खेळाडू
यक्षप्रश्न- धोनीनंतर कोण? वाचा सविस्तर
ज्या शहरात पोरं आयआयटी, जीईई, यूपीएससीचा अभ्यास करायची, तिथलं जगच धोनीने बदललं
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी – भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन
जशा शुभेच्छा सेहवागने धोनीला दिल्या, तशा कुणीच देऊ शकलं नाही
गृहमंत्री अमित शहांनी धोनीच्या निवृत्तीवर केलं ट्विट, म्हणाले हेलिकॉप्टर शॉट….