आयपीेलमध्ये आत्तापर्यंत अनेक कर्णधार पहायला मिळाले आहेत. त्यातही आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून किंग्ज इलेव्हन पंजाबने बर्याच खेळाडूंना आपला कर्णधार बनवले आहे, परंतु कोणत्याही कर्णधाराला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देता आले नाही. आर अश्विन गेल्या २ हंगामात संघाचे नेतृत्व करीत होता.
आयपीएल २०२० च्या लिलावाआधी पंजाबने अश्विनचा दिल्ली कॅपिटल्स संघासोबत ट्रेड केला. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने आता आयपीएल २०२० मध्ये नवीन कर्णधार म्हणून केएल राहुलला नेमले आहे. या लेखात अशी ५ कारणे देणार आहोत, ज्यामुळे असे म्हटले जाऊ शकते की केएल राहुल कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये यशस्वी होऊ शकतो.
१. दबावात शांत मनाने चांगले निर्णय घेण्याची क्षमता –
केएल राहुल शांत स्वभावाचा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो रागामध्ये कधी दिसला नाही, कोणताही खेळाडू शांत मनाचा असला तर तो दबावामध्ये असताना शांत राहुन चांगले निर्णय घेतो. यामुळेच केएल राहुल उत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध होऊ शकते. आयपीएल २०२० मधील दडपणाच्या वेळी त्याची क्षमता त्याला चांगले निर्णय घेण्यास मदत करेल.
२. सतत धावा करून इतर खेळाडूंना देखील प्रेरित करू शकतो
गेल्या २ वर्षांत किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोणता खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत असेल तर तो म्हणजे केएल राहुल. आयपीएल २०१८ मध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. तसेच, आयपीएल २०१९ मध्ये त्याने डेव्हिड वॉर्नरनंतर सर्वाधिक धावा केल्या. त्याचा आंतरराष्ट्रीय फॉर्मही चांगला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून सतत धावा करुन तो त्याच्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो.
त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो संघातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा देऊ शकतो आणि यामुळे संघाला फायदा होईल. त्यामुळे तो एक उत्तम कर्णधार म्हणून सिद्ध होऊ शकतो.
३. युएई मधील पंजाबचा विक्रम राहुलला कर्णधारपदासाठी करू शकतो मदत
आयपीएल २०१४ मध्ये काही सामने युएईमध्ये खेळले गेले होते आणि त्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने युएईमध्ये ५ सामने खेळले होते. हे पाचही सामने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने सहजतेने जिंकले, त्यामुळे युएईमध्ये त्यांच्या विजयाची टक्केवारी १००% आहे.
आयपीएल २०२० युएईमध्येच होणार आहे, त्यामुळे पंजाबच्या समर्थकांसाठी ही बातमी चांगली आहे. निश्चितच या वेळी देखील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला युएईमधील खेळपट्टी मदतशीर ठरु शकेल आणि अशा परिस्थितीत केएल राहुलला नेतृत्व करताना मोठा फायदा होऊ शकेल.
४. उत्कृष्ट टीम मॅनेजमेंटच्या सल्ल्याचा फायदा होईल
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आयपीएल २०२० साठी नवीन टीम मॅनेजमेंट मिळाले आहे. पंजाबने आपले जुने व्यवस्थापन काढून टाकले आहे. यावेळी पंजाबच्या संघाने आपले मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांची निवड केली आहे, जे भारताचे माजी प्रशिक्षक होते.
त्याचबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी र्होड्स आहे, जो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. गोलंदाजी प्रशिक्षकपदी वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज कर्टनी वॉल्श आहे. त्याचबरोबर भारतातील दिग्गज फलंदाज वसीम जाफरला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडले आहे.
अनिल कुंबळे, जॉन्टी रोड्स, कोर्टनी वॉल्श आणि वसीम जाफर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात हुशार खेळाडू म्हणून गणले जातात, त्यामुळे या चार दिग्गजांच्या येण्याने केएल राहुलला खूप मदत होईल. या चौघांच्या सल्ल्याने तो एक उत्तम कर्णधारपद सांभाळू शकतो.
५. राहुलच्या कर्णधारपदावर अपेक्षेचा दबाव नाही
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नेतृत्वात केएल राहुलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यावर अपेक्षांचे फारसे ओझे नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबची गोलंदाजी तितकी चांगली नाही हे सर्व चाहत्यांना ठाऊक आहे. त्याचबरोबर या संघाचा इतिहासही चांगला नाही. पहिल्या हंगामापासून खेळत असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाला आयपीएल चषकावर एकदाही आपले नाव कोरता आलेले नाही.
आयपीएल २०२० मध्येही चाहत्यांना पंजाब संघाकडून फारशी अपेक्षा नसल्यामुळे, याचा फायदा केएल राहुलला कर्णधार म्हणून होऊ शकतो. त्यामुळे जास्त दडपण न घेता संघाचा नेतृत्व करून तो एक उत्तम कर्णधार बनू शकेल.
ट्रेंडिंग लेख –
भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?
१५ ऑगस्ट दिवशी भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागला हा निकाल
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी आणखी दोन कंपन्यांनी दाखवला इंटरेस्ट
आयपीएल टीमला आलं टेन्शन, या कारणाने ऑस्ट्रेलिया इंग्लंडचे खेळाडू नाही खेळणार पहिल्या आठवड्यात
‘कॅप्टन कूल’ धोनीचा स्वॅग पाहिलाय का?, आलिशान गाडीतून पोहोचला एअरपोर्टवर