मुंबई । क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध होणार्या वन डे आणि टी 20 मालिकेसाठी 26 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने नऊ महिन्यांनंतर पुनरागमन केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने करार न केलेल्या उस्मान ख्वाजाला देखील संघात स्थान दिले आहे. निवडलेल्या संघात तीन नवे चेहरे आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा अजूनही संभ्रम अवस्थेत आहे. या दौऱयाबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरीही संघाची घोषणा केली आहे. सरकारची परवानगी मिळाल्यानंतरच या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ जाणार आहे. दौऱ्यास परवानगी मिळाल्यानंतर अंतिम संघ निवडला जाईल.
ग्लेन मॅक्सवेलने त्याचा शेवटचा सामना ऑक्टोबर 2019 मध्ये खेळला होता. मानसिक ताणतणावामुळे त्याने क्रिकेटमध्ये ब्रेक घेतला होता. खराब फॉर्ममुळे संघाबाहेर पडलेल्या उस्मान ख्वाजाने पुन्हा संघात स्थान मिळविण्यात यश मिळवले.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून हा संघ निवडण्यात आला असल्याची माहिती निवड समितीचे प्रमुख ट्रेव्हर हॉन्स यांनी सांगितले. डेनियल सॅम्स, रिले मेरेडिथ आणि जोश फिलिप हे संघातील नवे चेहरे आहेत. या तिघांनीही बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेला संभाव्य संघ :
शॉन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स केरी, पॅट कमिंस, एरॉन फिंच, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमोट, रिले मेरेडिथ, माइकल नेसर, जोश फिलिप, डेनियल सॅम्स , डी आर्सी शॉर्ट, केन रिचर्डसन, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, एंड्रयू टाई, मॅथ्यू वेड, डेविड वार्नर, अॅडम झॅम्पा