नुकतेच काही दिवसांपूर्वी आयसीसीचे माजी पंच स्टिव्ह बकनर यांनी म्हटले होते की, त्यांनी २००८मध्ये सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेत २ चूका केल्या होत्या. त्यानंतर आता स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठानने या मुद्द्यावर आपले मत स्पष्ट केले आहे.
“एक क्रिकेटपटू म्हणून आम्ही त्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही वेळी वाईट पंचगिरीचा सामना केला. त्या सामन्यात पंचाकडून केवळ १ नाही तर तब्बल ७ चुका झाल्या होत्या. अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) ज्यावेळी फलंदाजी करत होता, तेव्हा तो ३ वेळा बाद झाला होता. परंतु पंचाने एकदाही त्याला बाद घोषित केले नाही,” असे पठाण (Irfan Pathan) म्हणाला.
“तुम्ही किती चुका मान्य करता, याचा काही फरक पडत नाही. जे व्हायचे होते, ते झाले. आम्ही तो सामना गमावला. मला आठवते की मी माझा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे खेळला होता तसेच तो सामना आम्ही जिंकलो होतो. आणि फक्त पंचांच्या चुकीमुळे आम्ही सिडनी कसोटी सामना गमावला? पंच आता काय बोलतात याने काहीही फरक पडणार नाही,” असेही तो पुढे म्हणाला.
“सायमंड्स सामनावीर होता, आम्ही सिडनी कसोटीत १२२ धावांनी पराभूत झालो होतो. सायमंड्सविरुद्ध फक्त एक जरी निर्णय योग्य ठरला असता, तर आम्ही तो सामना सहज जिंकला असता,” असे पठाण म्हणाला.
याव्यतिरिक्त भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू सायमंड्समध्ये झालेल्या मंकी गेट प्रकरणामुळेदेखील तो सामना वादग्रस्त राहिला होता. हा वाद इतका वाढला होता की, आयसीसीला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला होता.
सिडनी कसोटी (Sydney Test) क्रिकेटला क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त सामना म्हटले जाते.