आयपीएलमध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुबईचे आक्रमक फलंदाज हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांनी फिरकीपटू कृष्णप्पा गॉथम याने फेकलेल्या शेवटच्या षटकात केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबईला 20 षटकात 191 ही मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.
शेवटचे षटक फिरकीपटूला दिल्याबद्दल पंजाबचा कर्णधार केएल राहुल याच्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पंजाबचा मध्यमगती गोलंदाज जेम्स निशम याने फेकलेल्या 16 व्या षटकात 22 धावा केल्या, तो 45 चेंडूत 70 धावा करून बाद झाला. यानंतर, पोलार्ड आणि हार्दिक पंड्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी केवळ 25 चेंडूत 67 धावा केल्या. मुंबईचा फिरकीपटू कृष्णप्पा गॉथम याने 20 वे षटक फेकले. त्याच्या शेवटच्या तीन चेंडूंमध्ये पोलार्डने सलग तीन षटकार ठोकले, या षटकात मुंबईने 25 धावा केल्या. पोलार्ड आणि पंड्या यांनी 19 व्या षटकात 19 धावा आणि 18 व्या षटकात 18 धावा केल्या. शेवटच्या 6 षटकात मुंबईने 104 धावा केल्या.
सचिन तेंडुलकरने मुंबईच्या शानदार कामगिरीबद्दल ट्विट केले आणि रोहित शर्माच्या खेळीचे कौतुक केले, याशिवाय पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या रणनीतीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सचिनने नाव न घेता आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “पोलार्ड आणि हार्दिक समोर असतानाही 20 व्या षटकात फिरकीपटूला गोलंदाजी दिली…!”
सचिनने यानंतर डोक्यावर हात ठेवून असलेली इमोजी शेअर केला, त्यामुळे असे दर्शवते की शेवटच्या षटकात फिरकीपटूला गोलंदाजी देऊन राहुलने मोठी चूक केली. हार्दिक आणि पोलार्डने या षटकात 4 षटकारांसह 25 धावा ठोकल्या.
191 is a very competitive total on this ground. Brilliantly paced innings by @ImRo45. An off spinner to bowl against @hardikpandya7 and @KieronPollard55 in the 20th over! 🤦♂️#KXIPvMI #IPL2020
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 1, 2020
गतविजेत्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. पंजाबचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याला शून्यावर बाद केले. मागील सामन्यात एका षटकात पाच षटकार देणाऱ्या कॉट्रेलने या सामन्यात शिस्तबद्ध पद्धतीने गोलंदाजी केली. रोहितने डावाच्या पहिल्याच चेंडूवर शानदार कव्हर ड्राइव्ह मारून आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या. त्याच्याआधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली होती.