-ओमकार मानकामे ([email protected])
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील जवळपास एक-तृतीयांश धावा ह्या मुंबईच्या फलंदाजांनी केलेल्या आहेत. आजपर्यंतच्या खेळल्या गेलेल्या ८४ रणजी ट्रॉफीजपैकी ४१ मुंबई क्रिकेटच्या ताब्यात आहेत. एखाद्या स्पर्धेत इतके प्रचंड प्रभुत्व गाजवल्याचे दुसरं उदाहरण क्रीडाविश्वात सापडणं अवघड. या विजयांमागे जवळपास १४० वर्षांचा इतिहास उभा आहे ज्याबद्दल जास्त माहिती आपणास नाही. म्हणून अशा या दैदिप्यमान परंपरेचा आढावा घेणारी हि लेखमालिका
“Cricket is an Indian sport, accidently invented by British” (क्रिकेट हा ब्रिटिशांनी चुकून शोधलेला भारतीय खेळ आहे) अशी एक म्हण आहे. भारतात ह्या खेळाची पाळेमुळे रुजण्याचे कारण म्हणजे भारतावर असलेले ब्रिटिश राज.
इंग्लंडच्या काही धनगरांनी वेळ घालवण्यासाठी सुरु केलेला खेळ हा ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. इंग्लिश राज्यकर्ते आणि सैनिकांमार्फत हा खेळ भारतात आला. अर्थात तेव्हा हा खेळ फक्त युरोपिअन मालकांसाठीच होता, “नेटिव्ह” लोकं फक्त सामन्यासाठीची सज्जता आणि खेळाडूंच्या प्रशंसेपुरते होते.
मुंबई ही तशी ब्रिटिशांची लाडकी. बॉंबेचा किल्ला उध्वस्त केल्यानंतर मुंबई शहरातली प्रचंड मोकळी जागा इकडच्या रहिवाश्यांना खेळासाठी खुणावू लागली आणि मग साहेबांचा मैदानी खेळ खेळायची उर्मी एत्तद्देशीयांच्या मनी उगवली. भारताचे प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या या शहरात क्रिकेट पहिल्यांदा खेळणारे लोकं म्हणजे पारसी.
भारतीयांचा पहिला क्रिकेट क्लब मुंबईमध्ये स्थापित झाला तो होता १८४८ साली पारश्यांचा ‘ओरिएंटल क्रिकेट क्लब’. पुढच्या २० वर्षात मुंबईत जवळपास तीसेक पारसी क्लब अस्तित्वात आले आणि कावसजी जहांगीर- सोराबजी शापूरजी सारख्या बड्या प्रस्थांच्या साहाय्याने यांच्या आपापसात स्पर्धा होऊ लागल्या.
याच सुमारास बॉम्बे गव्हर्नरच्या पुढाकाराने १८७५ साली ‘बॉम्बे जिमखाना’ची स्थापना झाली जो आजही दिमाखात उभा आहे. १८७७ला पहिल्यांदा पारसी संघ आणि बॉम्बे जिमखानाच्या युरोपिअन संघात सामना खेळला गेला. मैदानासाठींच्या भांडणानंतर काही वर्षाच्या अंतराळानंतर १८८४ पासून हे सामने वार्षिक तत्वावर खेळले जाऊ लागले.
पारश्यांनी आपला क्रिकेटचा जिमखाना १८८८साली प्रस्थापित केला. त्यांना पाहून मग १८९३ पर्यंत आज आपण मरीन ड्राईव्हला पाहतो ते, प्रथम मुस्लिम जिमखाना आणि नंतर हिंदू जिमखाना अस्तित्वात आले. १९०६ पर्यंत प्रामुख्याने गुजराती असा हिंदू संघ बळकट झाला होता आणि त्यांनी पारशी संघाला आव्हान दिले. पारशी संघाने मात्र हे आव्हान नाकारले, अशा वेळी युरोपिअन संघाने हिंदू संघाबरोबर झुंज स्वीकारली. हिंदू संघाने या सामन्यात ११० धावांनी विजय मिळवला.
१९०७ला हिंदू संघाने पुन्हा एकदा ब्रिटिश संघाला नामोहरम केले. या दोन्ही विजयांचा शिल्पकार होता डावखुरा फिरकी गोलंदाज बाळू पळवणकर. त्याने पहिल्या सामन्यात ८ तर दुसऱ्या सामन्यात १३ बळी पटकावले. जन्माने दलित असलेल्या बाळूला संघाकडून खेळायची मुभा असली तरी त्याचे जेवण आणि पिण्याचे पाणी त्याच्या संघापेक्षा वेगळे ठेवले जायचे.
पुढे पारशी संघाने सुद्धा ह्या सामन्यांमध्ये भाग घ्यायचे ठरवले. अशा प्रकारे बॉम्बे जिमखाना, पारशी संघ आणि हिंदू संघ ह्यांचे एकमेकांविरुद्ध सामने खेळण्यास सुरुवात केली आणि १९०७पासून मुंबईत त्रिरंगी स्पर्धा चालू झाली.
सततच्या अटीतटीच्या सामन्यांमुळे भारतीय क्रिकेटचा दर्जा उंचावला आणि १९११ला एक सर्व-भारत संघ इंग्लंडला धाडण्यात आला. सांघिक पातळीवर जास्त यश मिळालं नसले तरी वैयक्तिक पातळीवर हा दौरा फलदायी ठरला. यात मुंबईच्या पळवणकर बंधूनी नेत्रदीपक यश मिळवलं. गोलंदाज म्हणून बाळू पळवणकर तर मुख्य फलंदाज म्हणून त्याचा धाकटा भाऊ शिवराम पळवणकर नावारूपास आला. या दौऱ्यावर एच.डी.कांगा सुद्धा खेळले (ज्यांच्या नावे कांगा लीग खेळली जाते).
त्रिरंगी स्पर्धेचे रूपांतर चौरंगी स्पर्धेत झाले ते म्हणजे १९१२ साली मुस्लिम संघाच्या आगमनाने. ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी हळहळू भारताच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू यायला लागले आणि ही स्पर्धा पुढे ‘बॉम्बे क्रिकेटचे कार्निवल’ समजली जाऊ लागली.
या चौरंगी स्पर्धेबद्दल माहिती आपण नंतरच्या भागात बघूच. भारतीय क्रिकेट इतिहासाला कलाटणी देणारा एक फार महत्त्वाचा सामना खेळला गेला बॉम्बे जिमखानाच्या मैदानावर १९२६ साली. नक्की काय घडलं या सामन्यात आणि त्याचे भारतीय क्रिकेटवर काय परिणाम झाले बघू पुढील भागात.
क्रिकेटवरील ‘गोष्ट एका क्रिकेटरची’ लेखमालेतील अन्य लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर