---Advertisement---

हा दिग्गज म्हणतो, ‘त्यावेळी समजून जा धोनीने पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे’

On: बुधवार, जुलै 22, 2020 10:11 PM
---Advertisement---

मागील अनेक महिन्यांपासून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा होत आहे. अनेकदा धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का असेही प्रश्न विचारले जात आहेत. धोनी २०१९ च्या विश्वचषकात शेवटचे खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.

त्यामुळे वेळोवेळी अनेक क्रिकेट जाणकारांनी धोनीच्या भविष्याबद्दल आणि त्याच्या निवृत्तीबद्दल भाष्य केले आहे. नुकतेच श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारानेही क्रिकबझ वेबसाईटवर हर्षा भोगले यांच्याशी बोलताना याबद्दल आपले मत मांडले.

हर्षा यांनी संगकाराला निवृत्तीसाठी योग्य वेळ काय असे विचारल्यावर संगकारा म्हणाला, ‘निवृत्तीची वेळ प्रत्येक खेळाडूसाठी बदलत असते. कधीकधी निवृत्तीसाठी अधिकृत घोषणेची किंवा प्रसिध्दीपत्रकाची आवश्यकता नसते. काही क्रिकेटपटू सहज बाजूला होतात आणि वादावादी, अनुमान आणि इतर सर्व गोष्टी इतरांवर सोडतात.’

धोनी नेहमीच त्याच्या शांत स्वभावाबद्दल ओळखला जातो. याबद्दल बोलताना संगकारा असेही म्हणाला की धोनी अन्य लोकांना त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करताना पाहून मनातून आनंद घेत असेल.

श्रीलंकेचा माजी कर्णधार संगकारा म्हणाला, ‘माझा विश्वास आहे की धोनी ही अशी व्यक्ती आहे ज्याला त्याने काय करावे यावर इतरांनी वाद घातलेला पहायला आवडेल. त्याच्यासाठी काय चांगले आहे, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.’

तसेच संगकाराला धोनीच्या पुनरागमनाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘धोनी हा निर्णय निवड समितीवर सोडेल. धोनी यंत्रणेचा आदर करतो आणि त्यामुळे तो निवडकर्त्यांवर निर्णय सोडून देईल. त्याने त्याच्या भविष्याबद्दल औपचारिक घोषणा करण्याचा निर्णय घेतला असेल, परंतु मला वाटते की तो कोण आहे, त्याचे क्रिकेट, त्याचे कुटुंब याबद्दल त्याला पुर्णपणे माहिती आहे.’

त्याचबरोबर संगकारा म्हणाला, ‘तो भारतासाठी निवडला जाईल की नाही याची त्याला जास्त काळजी असेल असे वाटत नाही. तो फक्त चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आनंदी असेल आणि अचानक जेव्हा तो चेन्नईसाठीही सराव करताना दिसणार नाही. तेव्हा तुम्हाला समजेल की धोनीने पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकजण वेगळा आहे.’

तसेच संगकारा असेही म्हणाला की, धोनी अशी एक व्यक्ती आहे ज्याला तो कोण आहे आणि तो निर्णय कसे घेईल, याबद्दल सुरक्षितता आणि आत्मविश्वास आहे. त्याला माहित आहे की त्याच्यासाठी, त्याच्या संघासाठी आणि देशासाठी काय चांगले आहे.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले १ वर्षे खेळला नसला तरी तो आयपीएल २०२० च्या मोसमातून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार होता. पण सध्या आयपीएलचा हा मोसम कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित झालेला आहे. हा मोसम सध्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येण्याची चर्चा आहे. त्यामुळे जर असे झाले तर धोनी लवकरच चाहत्यांना मैदानात दिसू शकतो.

ट्रेंडिंग घडामोडी –

यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांत परदेशी खेळाडूच ठरले होते किंग, फक्त एक भारतीय…

मियाँदादने भारतीय क्रिकेटरला दिली होती धमकी; रुम नंबर सांग, तिथं येऊन मारतो

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटरने आपल्याच गावाची अशाप्रकारे केली कोरोनाच्या तावडीतून सुटका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---