आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे खूप क्रिकेटपटू आहेत जे, वंशपरंपरेने अनेकदा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेट खेळताना दिसतात. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू जेफ मार्श यांचे दोन पुत्र शॉन व मिचेल ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत आहेत. इंग्लंडचे ख्रिस ब्रॉड यांचा मुलगा स्टुअर्ट ब्रॉड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. डेव्हिड विलीचे वडील पीटर विली यांनीदेखील इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.
भारतीयांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर महान फलंदाज सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकर याने भारतासाठी आपले कौशल्य दाखवले. १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी देखील वडिलांप्रमाणे भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडत आहे.
आज आपण अशा पाच दिग्गज क्रिकेटपटूंच्या मुलांविषयी जाणून घेऊया जे, भविष्यात आपापल्या राष्ट्रीय संघासाठी खेळताना दिसल्यास नवल वाटू नये.
समित द्रविड
भारतीय क्रिकेटच्या सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेल्या राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित हा देखील अत्यंत कमी वयात दर्जेदार क्रिकेट खेळताना दिसून येतोय.
राहुल द्रविड आणि माजी भारतीय फिरकीपटू व सध्याचे निवडसमिती अध्यक्ष सुनील जोशी यांचे पुत्र समित आणि आर्यन यांनी सचिन-कांबळी शैलीत क्रिकेट कारकीर्द सुरू केली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या बीटीआर कपच्या चौदा वर्षाखालील आंतरशालेय स्पर्धेत माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलकडून खेळताना, समितने १५० तर आर्यनने १५४ धावा फटकावल्या. दोघांच्या खेळींमुळे संघाने ५० षटकांत ५०० इतकी मोठी धावसंख्या रचली होती. समोरचा संघ अवघ्या ८८ धावांवर बाद झाला.
समितने २०१५ मध्ये बारा वर्षाखालील मुलांच्या गोपालन चॅलेंज स्पर्धेत सलग तीन अर्धशतके झळकावली होती. द्रविड प्रमाणेच समित देखील चांगला फलंदाज बनण्याच्या दिशेने चालला आहे. सुनील जोशी याचा मुलगा आर्यनने सुद्धा अपेक्षा उंचावल्या आहेत.
अर्जुन तेंडुलकर
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेला अर्जुन हा सर्वाधिक प्रतिभा असलेला खेळाडू मानला जातो. वडिलांच्या नावाचे वलय मोठे असल्याने अर्जुनवर वेगळाच दबाव आहे. अर्जुन अनेकदा भारतीय वरिष्ठ संघातील खेळाडूंसोबत सराव करताना दिसतो. २०१७ मध्ये अर्जुन इंग्लंड संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला असता, त्याने जॉनी बेअरस्टोला दुखापतग्रस्त केले होते.
२०१८ मध्ये सिडनी मैदानावरील सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून सलामीवीर म्हणून खेळताना अर्जुनने २७ चेंडूत ४८ धावा व गोलंदाजीत चार बळी घेतले होते. त्याच वर्षीच्या कूच बिहार ट्रॉफीमध्ये देखील त्याचे प्रदर्शन अप्रतिम राहिले होते.
डाव्या हाताने १४० किमी/ प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता व आक्रमक फलंदाजीमुळे वीस वर्षीय अर्जुन एका अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावतो. २०१९ मुंबई टी२० लीगमध्ये आकाश टायगर्स संघासाठी खेळताना त्याने ६ सामन्यात १०४ धावा व ५ बळी मिळवले आहेत.
ऑस्टिन वॉ
ऑस्ट्रेलियाच्या १९९९ विश्वविजेत्या संघाचा कर्णधार राहिलेल्या दिग्गज स्टीव वॉ यांचा मुलगा ऑस्टिन हादेखील क्रिकेट जगतात दाखल झाला आहे. २०१८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषकात तो ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य होता. अष्टपैलू असलेल्या ऑस्टिनने सतरा वर्षाखालील क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून युवा संघात प्रवेश केला होता.
भारतीय संघ २०१८-१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असता, ऑस्टिन सिडनी कसोटीवेळी राखीव खेळाडू म्हणून मैदानावर उतरला होता. २०२० बिग बॅशमध्ये ऑस्टिन सिडनी सिक्सर्स संघासाठी पदार्पण करू शकतो.
थांडो एंटिनी
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मखाया एंटिनी याचा मुलगा थांडो हा देखील दक्षिण आफ्रिका संघाच्या आसपास आलेला आहे. थांडोची चेहरापट्टी तसेच गोलंदाजीची शैलीदेखील आपल्या वडिलांप्रमाणेच आहे.
थांडोने २०१८ युवा विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. घरेलू क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केल्याने थांडोला २०१९ मध्ये राष्ट्रीय संघासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. अद्याप, थांडो राष्ट्रीय संघासाठी खेळला नसला तरी तो कायम संघासोबत असतो.
तेगनरीन चंद्रपॉल
वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेगनरीन हा देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेट खेळतो. चंद्रपॉल पिता-पुत्रांनी एकत्रितपणे २०१७ मध्ये प्रथमश्रेणी सामना खेळला होता.
२०१४ साली संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या युवा विश्वचषकात तेगनरीनने वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्याने दोन अर्धशतक व एक शतक झळकावत सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हापासून तो गयाना क्रिकेट संघाचा कायमस्वरूपी सदस्य आहे.
तेगनरीन आत्तापर्यंत २५ प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. त्याने १५०० हून अधिक धावा फटकावताना ३० ची सरासरी राखली आहे.
ट्रेंडिंग लेख-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनीच्या कोरोना चाचणीबद्दल आले मोठे वृत्त, सीएकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
-माजी क्रिकेटर राहुल द्रविड पुन्हा आला टीम इंडियाच्या मदतीला, आता सांभाळणार ही जबाबदारी
-‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…