क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. जिंकणे किंवा हारणे यापेक्षाही क्रिकेटच्या मैदानावर अनेक गोष्टी होत असतात. कित्येक वर्षांपासून क्रिकेट खेळले जाते, तरीही आजही क्रिकेटच्या मैदानावर विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. परंतू याच क्रिकेटच्या मैदानात कधी-कधी दुर्दैवी गोष्टी पाहायला मिळतात. ज्या क्रिकेटसाठी क्रिकेटरपटू जिवाच रान करतात, त्याच मैदानावर त्यांना जीव गमवावा लागला तर? ते कितीतरी दुर्दैवी ठरेल. मंडळी असं घडलं आहे. अगदी परदेशी खेळाडूंच्याच नाही तर भारतीय खेळाडूंबरोबरही हे घडले आहे. चला तर मंडळी या लेखात आपण अशाच क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मैदानावर आपले प्राण गमावले.
फिल ह्यूज
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युजेसला शेफिल्ड शिल्ड या देशांतर्गत स्पर्धेदरम्यान सीन अॅबॉटचा बाउन्सर त्याच्या डोक्यावर लागला. त्याने हेल्मेट परिधान केले असले तरी, त्याच्या मानेवर चेंडू गेल्याने तो गंभीर जखमी झाला. तो तीन दिवस कोमामध्ये राहिला आणि 27 नोव्हेंबर 2014 रोजी मरण पावला.
डॅरिन रँडल
दक्षिण आफ्रिकामध्ये स्थानिक सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज डॅरिन रँडल याच्या डोक्याला दुखापत झाली. पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला आणि तो खेळपट्टीवर पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तो वाचू शकला नाही. तो अवघ्या 32 वर्षांचा होता.
जुल्फिकार भट्टी
19 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या सामन्यात जुल्फिकार भट्टी या 22 वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या छातीवर चेंडू लागला होता. चेंडू लागताच तो खेळपट्टीवर पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तो बचावला नाही.
रिचर्ड ब्यूमोंट
इंग्लंडच्या रिचर्ड ब्यूमॉन्टला मैदानावर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात तो वाचला जाऊ शकला नाही. या जलदगती गोलंदाजाला बर्मिंघॅमच्या क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण तो वाचू शकला नाही.
वसीम राजा
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम राजाला हृदयविकाराचा झटका आला आणि 2006 मध्ये मैदानावर खेळत असताना त्यांचा मृत्यू झाला. राजा सरे मध्ये 50 षटकांचा सामना खेळत होता. दोन-तीन षटके गोलंदाजीनंतर त्याने अस्वस्थतेची तक्रार केली आणि त्यानंतर लवकरच त्याला हृदयविकाराचा झटका आला.
रमन लांबा
भारतीय फलंदाज रमण लांबा यांनी क्रिकेटची शानदार सुरुवात केली, पण त्याच्या आयुष्याचा शेवट खूपच वाईट ठरला. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे रमण लांबा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना मरण पावले होते. लांबा 20 फेब्रुवारी 1998 रोजी ढाका येथे बांगलादेश क्रिकेट क्लब अबहानी क्रीरा चक्रकडून खेळत होते. क्षेत्ररक्षणाच्या वेळी ते अगदी जवळून झेल पकडण्याच्या स्थितीत उभे होते. फलंदाजाने वेगवान शॉट मारला आणि चेंडू थेट रमण लांबाच्या डोक्यावर आदळला. त्यावेळी रमण लांबा हेल्मेट घातलेले नव्हते,त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून ते वाचू शकले नाहीत.
इयान फोली
इंग्लंडचा माजी खेळाडू इयान फोली याचेही चेंडू लागल्याने क्रिकेटच्या मैदानावर निधन झाले. 1993 मध्ये घरगुती स्पर्धेदरम्यान डर्बशायरकडून खेळलेल्या इयान फोलीला फलंदाजी करताना त्याच्या डोळ्याखाली चेंडू लागला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे फोलीने रुग्णालयात दम तोडला.
विल्फ स्लॅक
1989 मध्ये गाम्बिया येथे स्थानिक सामन्यादरम्यान इंग्लंडचा क्रिकेटपटू विल्फ स्लॅक याचे वयाच्या 34 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी सामन्यात स्लॅक चार वेळा बेशुद्ध झाला होता आणि बर्याच वेळा तपासणी करूनही डॉक्टरांना स्लॅकच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.
अब्दुल अजीज
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अब्दुल अजीज यांचेही मैदानावर चेंडू लागल्यामुळे निधन झाले. 17 जानेवारी 1958 रोजी पाकिस्तानच्या डोमेस्टिक क्रिकेट काद-ए-आजम स्पर्धेत डोक्याला चेंडू लागल्यानंतर अजीजने वयाच्या 18 व्या वर्षी आपला जीव गमाववा लागला.
जॉर्ज समर्स
एमसीसी विरुद्ध लॉर्ड्स येथे 1870 च्या सामन्या दरम्यान नॉटिंघॅमशायरकडून फलंदाजी करताना 25 वर्षीय जॉर्ज समर्स यांना चेंडू लागला. रुग्णालयात उपचार केल्यानंतर ते घरी आले. त्यानंतर चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.