झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत दुसऱ्या दिवशी आयर्लंड विरुद्ध ओमान हा सामना खेळला गेला. बुलावायो येथे झालेल्या या सामन्यात ओमान संघाने आश्चर्यकारक निकालाची नोंद करत 5 गडी राखून विजय मिळवला. अष्टपैलू झिशान मकसूद याने ओमानच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी ही स्पर्धा खेळली जात आहे. आठ संघांच्या या स्पर्धेतील दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. दुसऱ्या दिवशी ओमान विरुद्ध आयर्लंड अशा झालेल्या या सामन्यात ओमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजी संधी मिळाल्यानंतर आयर्लंड संघाला मॅकब्रायन व स्टर्लिंग यांनी 51 धावांची सलामी दिली. मात्र, ते दोघे लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले. कर्णधार बालबिर्नी हा देखील अपयशी ठरला. युवा हॅरी टेक्टर याने पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून येत 52 धावांची खेळी केली. टकरने 26 धावांचे योगदान दिले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जॉर्ज डॉकरेल याने संघाची धावसंख्या पुढे नेताना नाबाद 91 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर आयर्लंड संघाने 7 बाद 281 अशी मोठी मजल मारली.
या धावांचा पाठलाग करताना जतिंदर सिंगच्या रूपाने ओमानला पहिला धक्का लवकर बसला. मात्र, त्यानंतर कश्यप प्रजापती व अकीब इलियास यांनी अर्धशतके पूर्ण करत 94 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या झिशान मकसूद याने देखील अर्धशतक झळकावले. मोहम्मद नदीम याने अखेरपर्यंत नाबाद राहत 46 धावा करून संघाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला.
(2023 ODI World Cup Qualifiers Oman Beat Ireland By 5 Wickets)
महत्वाच्या बातम्या –
कमिन्सच्या घातक यॉर्करवर इंग्लिश फलंदाज फेल! बॅट-बॉलचा संपर्क होण्याआधीच उडाल्या दांड्या
“मला टीम इंडियाचा कर्णधार बनवणार होते पण…”, सेहवागने केला मोठा गौप्यस्फोट