क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना असतात ज्या चाहत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या जातात. काही खेळ्यांना तर ऐतिहासिक खेळ्यांचे महत्त्व प्राप्त होते. यापैकीच एक खेळी म्हणजे पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वर यांची भारतीय संघात विरुद्ध केलेली १९४ धावांची खेळी. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळलेल्या त्या ऐतिहासिक खेळीला आज (२१ मे) २५ वर्ष म्हणजेच दोन तप पूर्ण होऊन गेले.
अन्वरचा धडाका
सन १९९७ मधील इंडिपेंडन्स कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही कट्टर संघ एकमेकांसमोर होते. हा सामना पुढे जाऊन क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट सामन्यांपैकी एक बनेल याची कोणाला कल्पना नव्हती. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तान संघाला खराब सुरुवात भेटली व शाहिद आफ्रिदी झटपट बाद झाला. मात्र, त्यानंतर डावाची सर्व सूत्रे अनुभवी सलामीवीर व भारताला कायमच नडणाऱ्या सईद अन्वरने आपल्या हाती घेतली. एका बाजूने साथीदार त्याला थोडी थोडी साथ करत राहिले व तो पाकिस्तानचा डाव पुढे नेत राहिला.
भारतीय संघाचा कामचलाऊ फिरकी गोलंदाज सचिन तेंडुलकर याच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी अन्वरने १९४ धावांची अप्रतिम खेळी केली होती. अन्वरने १४६ चेंडूत केलेल्या या खेळीदरम्यान २२ चौकार व ५ उत्तुंग षटकार ठोकलेले. वनडे क्रिकेटमधील ही त्यावेळची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या बनली. १३ वर्षापूर्वी सर विवियन रिचर्ड्स यांनी ठोकलेल्या १८९ धावांचा विक्रम त्याने मोडीत काढलेला. अन्वरचा हा विश्वविक्रम पुढे १३ वर्ष टिकला जो सचिन तेंडुलकरनेच २०१० मध्ये वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक ठोकत आपल्या नावे केला.
https://twitter.com/ICC/status/1395567827076190211
भारताने केली प्रयत्नांची पराकाष्ठा
पाकिस्तानने दिलेल्या ३२८ धावांच्या आव्हानापुढे भारतीय संघासाठी राहुल द्रविडने १०७ धावांची खेळी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक पूर्ण केले. त्याला विनोद कांबळीने ६५ धावा करत चांगली साथ दिली. रॉबिन सिंग (३५) व नयन मोंगिया (२३) यांनी अखेरीस भारताला विजयापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, भारत २९२ पर्यंतच मजल मारू शकला. आपल्या ऐतिहासिक खेळीसाठी सईद अन्वरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
बॉलर नहीं, फिनिशर हू मैं! अश्विनने राजस्थानला मिळवून दिलं ‘क्वालिफायर १’चं तिकीट, होतंय कौतुक
राजस्थानच्या चेन्नईवरील विजयाने लखनऊला धक्का, फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी संजूपुढे गुजरातचे आव्हान






