इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वात मोठी टी20 लीग आहे. गेल्या 15 वर्षांत लीगची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दरम्यान बीसीसीआय या स्पर्धेचा चांगल्याप्रकारे प्रचार करत आहे. आता आयपीएल 2023चे वारे वाहू लागले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक मोठे विक्रम बनले आहेत. जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू येथे खेळतात, त्यामुळेच येथे अनेक मोठे विक्रम बनले आहेत आणि अजूनही बनत आहेत. मात्र, या लीगमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळते, जे त्यांच्यासाठी आपलं करियर बनवण्याचं एक उत्तम व्यासपीठ बनले आहे.
वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, युवराज सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, शेन वॉर्न, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांसारखे दिग्गज खेळाडू या आयपीएलचा भाग राहिले आहेत. आपण आतापर्यंतच्या आयपीएल लीगवर नजर टाकली, तर असं लक्षात येते की, जगातील अनेक दिग्गज खेळाडू कोणत्या ना कोणत्या संघाशी जोडले गेले आहेत. दरम्यान यातील काही क्रिकेटपटूंची कामगिरी त्यांच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात चांगली नव्हती, पण काही खेळाडू असे होते, ज्यांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.
या लेखात आम्ही तुम्हाला अशा 3 दिग्गज खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. चला तर पाहुयात ते गोलंदाज नेमके कोण आहेत…
आयपीएल कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर विकेट घेणारे 3 खेळाडू
लसिथ मलिंगा
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज हा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आहे. तो त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्स या एकाच फ्रँचायझीकडून खेळला. मलिंगाने त्याचा शेवटचा आयपीएल सामना आयपीएल 2019च्या अंतिम सामन्यात खेळला होता. याच सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवर विकेट घेत मुंबई इंडियन्सला तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवले होते. 2020 मध्ये त्याने खासगी कारणामुळे आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले. त्याच वेळी, त्याने 2021 हंगामापूर्वी आयपीलमधून निवृत्ती घेतली. अशाप्रकारे, आयपीएल 2019चा अंतिम सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
ऍडम गिलख्रिस्ट
ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) हा एक यष्टीरक्षक फलंदाज होता आणि त्याला क्षेत्ररक्षण करताना पाहणे औत्सुक्याचे वाटायचे. दरम्यान शेवटच्या सामन्यापर्यंत गिलख्रिस्टने आयपीएलमध्ये एकही चेंडू टाकला नव्हता. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटचा सामना तो खेळला होता. याच सामन्यात मुंबई इंडियन्सला शेवटच्या 6 चेंडूत 51 धावा हव्या होत्या आणि फक्त एक विकेट शिल्लक होती. दरम्यान कर्णधार गिलख्रिस्टने स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रवीण कुमारने कीपिंग करत गिलख्रिस्टने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हरभजन सिंगला बाद केले होते.
अनिल कुंबळे
अनिल कुंबळे (Anil Kumble) हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत शेवटच्या चेंडूवर विकेट पटकावली आहे. 2010च्या आयपीएल लीगमध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादविरुद्ध त्याने हा विक्रम केला होता. या सामन्यात अनिल कुंबळेने फक्त 16 धावांत 4 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान आपल्या शेवटच्या चेंडूवर प्रज्ञान ओझाला बाद करून कुंबळेने आयपीएल कारकीर्द संपवली होती. (3 cricketers who take wicket on last ball in ipl career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईने रिलीज केलेल्या खेळाडूने लावली शतकांची रांग, केली किंग कोहलीच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी
संघ सहकारीच म्हणतोय, “रिषभला ओपनिंगच करायला द्यायला हवी”