इंग्लंडचा संघ काही दिवसांपूर्वीच भारत दौऱ्यावर आला आहे. इंग्लंडच्या संघाला भारताविरुद्ध या दौऱ्यात सुरुवातीला ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ५ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. तर शेवटचे २ सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे.
त्यामुळे संघात निवड झालेले दोन्ही संघांचे खेळाडू चेन्नईला पोहचले असून २ फेब्रुवारीपासून सरावाला सुरुवात करतील. त्यामुळे जसजशी ही मालिका जवळ येत आहे, चाहत्यांमध्येही उत्साह बघायला मिळत आहे.
भारतीय संघात पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी एकूण १८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यातील ३ खेळाडू महाराष्ट्रीयन आहेत. या तीन खेळाडूंबद्दल या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
३. अजिंक्य रहाणे –
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा बऱ्याच वर्षापासून भारताच्या कसोटी संघाचा मधल्या फळीतील नियमित खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकदा महत्त्वाच्या क्षणी चांगला खेळ करत भारताला संकटातून बाहेर काढले आहे.
रहाणे हा मुळचा संगमनेर तालुक्यातील आहे. पण लहानपणापासूनच रहाणे आपल्या कुटुंबाबरोबर डोंबिवली येथे राहतो. त्यामुळे त्याची जडण-घडण डोंबिवलीतच झाली असून तो देशांतर्गत क्रिकेटही मुंबईकडून खेळतो.
रहाणेने नुकतेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवण्याचा कारनामा केला आहे. आता तो इंग्लंडविरुद्ध उपकर्णधार म्हणून खेळण्यास सज्ज झाला आहे.
रहाणेने आत्तापर्यंत ६९ सामने खेळले असून ४२.५८ च्या सरासरीने ४४७१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १२ शतकांचा आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
२. रोहित शर्मा –
भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा मुंबईकर असल्याचं अनेकांना माहित आहे. पण रोहितचा जन्म मुंबईला नाही तर नागपूरला झाला आहे. पण त्याच्या जन्मावेळी घरीची परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने तो लहान असतानाच त्याचे पालक मुंबईला स्थायिक झाले. त्यामुळे रोहित मुंबईतच लहानाचा मोठा झाला. रोहित देशांतर्गत क्रिकेटही मुंबईकडून खेळतो. तसेच तो आयपीएलही मुंबईकडून खेळतो.
लहानपणापासून महाराष्ट्रात वाढलेल्या रोहितने २०१३ साली भारताकडून कसोटीत पदार्पण केले असून त्याने आत्तापर्यंत ३४ कसोटी सामने खेळले असून यात त्याने ६ शतके आणि ११ अर्धशतकांसह २२७० धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने २ विकेट्सही घेतल्या आहेत.
याबरोबरच साल २०१९पासून रोहितने कसोटीत सलामीला फलंदाजी करण्यासही सुरुवात केली आहे. त्याआधी तो मधल्या फळीत फलंदाजी करायचा.
१. शार्दुल ठाकूर –
नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा झालेल्या खेळाडूंमध्ये शार्दुलचे नाव आघाडीवर आहे. त्याने ब्रिस्बेन कसोटीतून २ वर्षांनी कसोटीत पुनरागमन केले होते. त्याआधी शार्दुलने सन २०१८ ला १ कसोटी सामना खेळला होता. मात्र, त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. पण, त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीत मात्र त्याने शानदार कामगिरी करताना सर्वांची वाहवा मिळवली.
शार्दुलने भारताकडून फलंदाजी करताना ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावात ११५ चेंडूत ६७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने ६२ धावा करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर बरोबर १२३ धावांची भागीदारीही केली होती. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजी करताना पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.
पालघरपासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर लागते ते माहीम गाव. शार्दुलही याच गावात वाढलेला. शार्दुलचे वडील आणि काका हे दोघेही स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळले असल्याने शार्दुलला क्रिकेटचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. शार्दुल कारकिर्दीच्या सुरुवातीपासून पालघर ते मुंबई हा लांबचा प्रवास लोकलने करायचा. यानंतर त्याला त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये बोरिवलीत ठेवून घेतले होते.
अखेर शार्दुलच्या या मेहनीतीचे फळ त्याला मिळाले असून आता आता त्याला इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे तो आता कशी कामगिरी करतो हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…म्हणून धावा काढण्यापेक्षा चेंडू खेळून काढणे महत्वाचे असते”, चेतेश्वर पुजाराचे रोखठोक मत
‘नमों’नी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचं केलं कौतुक, रवी शास्त्री म्हणाले…
बुमराहने केलेली नक्कल पाहून कुंबळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…