यूएई येथे मागील आठवड्यात आयपीएलचा तेरावा हंगाम संपन्न झाला. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्सने आपले विजेतेपद राखले. आयपीएल २०२० समाप्त होऊन आठवडाही उलटला नसताना; आयपीएल २०२१ च्या बातम्यांनी जोर धरला आहे. पुढील आयपीएलचा संभाव्य कालावधी आणि दोन नव्या संघांचा समावेश, या बातम्या ताज्या असताना खेळाडूंचा मेगा लिलाव व्हावा यासाठी काही संघ आग्रही आहेत.
सर्व फ्रॅंचाईजी लिलावाच्या माध्यमातून आपली संघबांधणी करत असतात. तीन वर्षातून एकदा होणाऱ्या मेगा लिलावात संघ आपले प्रमुख खेळाडू निवडतात. या मेगा लिलावात अनेक विदेशी खेळाडू करोडपती झालेले आपण पाहतो. यातील काही खेळाडू आपल्या किमतीच्या तोलामोलाची कामगिरी करतात. तर काही खेळाडू आपल्या किमतीच्या तुलनेत अगदी निरस कामगिरी करताना दिसून येतात. आयपीएल २०२० मध्येही काही असे खेळाडू होते, ज्यांचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे नाव असलेल्या या खेळाडूंनी अत्यंत सुमार कामगिरी केली होती. त्यांच्या या खराब कामगिरीमुळे, पुढील हंगामात त्यांना खरेदीदार लाभण्याची शक्यता अगदी कमी आहे.
आज आपण अशाच तीन विदेशी खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, जे कदाचित पुढील वर्षी आयपीएलमध्ये दिसणार नाहीत.
१) ऍरॉन फिंच
ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच पुढील आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आयपीएल २०२० मध्ये फिंचने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. फिंच जी प्रतिष्ठा घेऊन आयपीएलमध्ये दाखल झाला होता, त्या प्रकारची कामगिरी तो करू शकला नाही. संपूर्ण हंगामात १२ सामने खेळताना फिंच २२.३५ च्या मामुली सरासरीने अवघ्या २६८ धावा बनवू शकला. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता.
आत्तापर्यंत आठ वेगवेगळे आयपीएल संघांकडून खेळलेल्या फिंचला आरसीबी संघ व्यवस्थापन करारमुक्त करू शकते. त्यानंतर, मेगा लिलावातही कोणताही संघ त्याच्यासाठी बोली लावण्याची शक्यता धूसर आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर कायमच अडखळणाऱ्या फिंचची आयपीएल २०२० अखेरची आयपीएल ठरू शकते. फिंचने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे नेतृत्व देखील केले होते.
२) ग्लेन मॅक्सवेल
आयपीएल २०१४ चा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा माजी कर्णधार ग्लेन मॅक्सवेल पुढील वर्षी आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता अगदीच कमी आहे. आयपीएल २०२० मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना मॅक्सवेलने १३ सामन्यात १०८ धावा जमवल्या. मॅक्सवेल या पूर्ण हंगामात इतका सुपरफ्लॉप ठरला की, तो एक षटकार देखीलही मारू शकला नाही. फक्त आयपीएल २०२० नव्हे तर, मॅक्सवेल गेले तीन-चार हंगाम सातत्याने फ्लॉप ठरत आहे.
दरवेळी लिलावात कोट्यावधी रुपये कमावणारा मॅक्सवेल यावेळी देखील १० कोटी रुपये घेऊन पंजाबसाठी खेळला होता. किमतीच्या बदल्यात तशी कामगिरी करून दाखवण्यात तो अपयशी ठरल्याने पंजाब त्याला संघातून बाहेर करण्याची दाट शक्यता आहे. सोबतच, पुढील वर्षी त्याला कोणी खरेदीही करणार नाही, असा अंदाज लावला जात आहे. मॅक्सवेलच्या नावे आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १,५०५ धावा आणि १९ बळी आहेत.
३) जिमी नीशम
बेन स्टोक्स आणि हार्दिक पांड्या यांच्यापाठोपाठ, सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू मानला जाणारा न्यूझीलंडचा जिमी नीशम हा देखील पुढील वर्षी आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आयपीएल २०२० मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केलेला नीशम स्पर्धेतील फ्लॉप खेळाडूंच्या यादीत वरच्या क्रमांकावर राहिला. संपूर्ण स्पर्धेत पाच सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. ज्यात तो फक्त १९ धावा व २ बळी मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याचा इकॉनोमी रेट देखील ९.८६ इतका महागडा राहिला.
अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या नीशमला फिनिशर आणि उपयोगी गोलंदाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या निभावण्यात अपयश आले. आयपीएल २०२१ पूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब त्याला करारातून वगळणार, असा अंदाज लावला जात आहे. सोबतच, आगामी मेगा लिलावात कोणताही संघ त्याच्यावर बोली लावण्यात उत्सुक असण्याची शक्यता कमी आहे.
ट्रेंडिंग लेख –
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी
ही ‘त्रिमूर्ती’ गाजवणार आयपीएल २०२१चा मेगा लिलाव; निवृत्त झालेला खेळाडू होणार मालामाल?
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझम की विराट कोहली? पाकिस्तान सुपर लीगनंतर चाहत्यांनी केली तुलना
धोनीच्या नेतृत्वाखाली अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती
अरेरे..! कमीतकमी स्वतःच नाव तरी बदल; पाहा का झाला शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल