इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व जुन्या ८ संघांनी आपल्या खेळाडूंना रिटेन केले आहे. यावेळी झालेल्या रिटेन प्रक्रियेत अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले होते. युवा खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात आली, तर दिग्गज खेळाडूंना रिलीज करण्यात आले. तसेच रिटेन केलेल्या युवा खेळाडूंना दिग्गज खेळाडूंपेक्षा अधिक किंमत मिळाली. रिलीज करण्यात आलेल्या दिग्गज खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागू शकते. त्यापैकी काही खेळाडू लिलाव सोहळ्यापूर्वीच मालामाल होऊ शकतात.
आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलाव सोहळ्यापूर्वी नव्याने समाविष्ट झालेल्या लखनऊ आणि अहमदाबाद संघांना ३-३ खेळाडू रिटेन करण्याची संधी आहे. ज्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर आहे. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव आयोजित करण्यात येऊ शकतो.
रिलीज करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये डेविड धवन, केएल राहुल, फाफ डू प्लेसिस, राशिद खान, हार्दिक पंड्या, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यासाठी फ्रँचायझी वाटेल तितकी रक्कम खर्च करायला तयार असतील. चला तर पाहुया असे ३ खेळाडू जे मेगा लिलाव होण्यापूर्वी कोट्यवधीची कमाई करतील.
१) केएल राहुल – पंजाब किंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलावापूर्वी चर्चेत आहे. त्याने पंजाब किंग्ज संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता येणाऱ्या हंगामात तो लखनऊ संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. केएल राहुल लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाहीये. तो थेट लखनऊ संघात प्रवेश करू शकतो. त्याला लखनऊ संघाने २० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, अशी चर्चा सध्या होत आहे.
यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. यापूर्वी विराट कोहली सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २०१८ मध्ये १८ कोटी रुपये दिले होते.
आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी
केएल राहुलने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने १३ सामन्यात ३ वेळेस नाबाद राहून ६२. ६० च्या सरासरीने ६२६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ६ अर्धशतकांचा समावेश होता.
२) श्रेयस अय्यर – गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच २०२० मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला मुंबई इंडियन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेपूर्वी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे रिषभ पंतला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. आता त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने रिलीज केले आहे. ज्यामुळे तो आगामी आयपीएल हंगामात अहमदाबाद संघातून खेळताना दिसून येऊ शकतो. अहमदाबाद संघ त्याला जास्तीची किंमत देऊन संघाचे कर्णधारपद देखील देऊ शकतो.
पदार्पणाच्या सामन्यात झळकावले शतक
सध्या श्रेयस अय्यर चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याला न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली आहे. कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात त्याने शतक आणि अर्धशतक झळकावले होते.
३) राशिद खान – राशिद खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने गेली अनेक वर्ष सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच या संघाला जेतेपद मिळवून देण्यात देखील मोलाची भूमिका बजावली आहे. त्याला सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीकडून हवी तितकी रक्कम मिळत नव्हती, त्यामुळे त्याने आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी सनरायझर्स हैदराबाद संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता राशिद खानला नवीन फ्रँचायझीकडून खेळायचे आहे. अशा गोलंदाजाला खरेदी करण्यासाठी कुठलीही फ्रँचायझी पैसा खर्च करताना मागचा पुढचा विचार करणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कोण असेल राजस्थान रॉयल्सचा पुढील कर्णधार? कुमार संगकाराने केला खुलासा
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या जेमिसनचे शुबमनने केले ‘स्वॅग से स्वागत’, ठोकले ३ जबरदस्त चौकार
विश्रांती घेऊन आला विराट; नकोसा विक्रम करून गेला विराट