गुरुवारी (२५ मार्च) ‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनी याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तब्बल १२ आयपीएल हंगामात ज्या चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व त्याने सांभाळले, त्या संघाचे कर्णधारपद त्याने आता सोडले आहे. त्यामुळे आयपीएलच्या १५ व्या हंगामात अष्टपैलू रविंद्र जडेजा चेन्नईचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. असे असले तरी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडल्याने त्याच्या नेतृत्त्वातील एका युगाचा अंत झाल्याच्या भावना क्रिकेटविश्वातून व्यक्त होत आहेत.
एमएस धोनीची (MS Dhoni) भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना होते. त्याने आत्तापर्यंत केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही, तर आयपीएलमध्येही अनेक पराक्रम केले आहेत, ज्यांना मोडणे कठीण आहे. धोनी २००८ पासून आयपीएल खेळला आहे.
तो आयपीएलमध्ये आत्तापर्यंत २००८ च्या पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. याला अपवाद फक्त २०१६ आणि २०१७ चा मोसम राहिला. या दोन मोसमांसाठी चेन्नई सुपर किंग्सवर स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे चेन्नई या दोन मोसमांसाठी आयपीएमध्ये सहभागी झाले नव्हते. या दोन मोसमासाठी सामील झालेल्या रायझिंग पुणे सुपर जायंट्स या नव्या संघाकडून धोनी खेळला. २०१८ ला चेन्नईने पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर धोनी पुन्हा चेन्नई संघात सामील झाला.
धोनीची आयपीएल कारकिर्द
धोनीने आयपीएलमध्ये २२० सामने खेळले आहेत. यात त्याने ३९.५५ च्या सरासरीने ४७४६ धावा केल्या असून २३ अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने यष्टीरक्षण करताना १६१ विकेट्स घेतल्या आहेत. धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिकवेळ कर्णधार म्हणून घालवला आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या १४ आयपीएल हंगामातील १३ हंगामात नेतृत्त्व केले आहे.
धोनीचे हे विक्रम मोडणे कठीण
कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू –
धोनीने आयपीएलमध्ये २२० सामने खेळताना २०४ सामन्यात नेतृत्त्वही केले आहे. यातील १२१ सामन्यात विजय मिळवला आहे. त्याने ११६ सामने चेन्नईचे नेतृत्व करताना (CSK Captaincy) जिंकले आहेत, तर ५ सामने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व करताना जिंकले आहेत. धोनी आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांत विजय मिळवणारा पहिला कर्णधार आहे. धोनीच्या पाठोपाठ सर्वाधिक आयपीएल सामने जिंकणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव येते. रोहितने ७५ सामने कर्णधार म्हणून जिंकले आहेत.
कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू
धोनीने आयपीएलमध्ये २०४ सामन्यात नेतृत्त्व केले आहे, त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा कर्णधार आहे. एवढेच नाही, तर तो २०० पेक्षा अधिक आयपीएल सामन्यांत नेतृत्त्व करणारा देखील एकमेव कर्णधार आहे. या यादीत त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने आयपीएलमध्ये १४० सामन्यांत नेतृत्त्व केले आहे.
संघाच्या घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवणारा पहिला कर्णधार –
चेन्नई सुपर किंग्सने २०११ च्या आयपीएल मोसमाचे विजेतेपद चेन्नई येथे त्यांच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळताना मिळवले होते. त्यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत केले होते. त्यामुळे ज्या संघाचे नेतृत्व करतोय त्या संघाच्या घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवणारा धोनी पहिला आणि सध्यातरी एकमेव कर्णधार आहे.
आयपीएलमध्ये २०१० ला सचिन तेंडुलकरला आणि २०१६ ला विराट कोहलीला असा विक्रम करण्याची संधी होती. मात्र त्या त्यांना अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी-विराटने सोडले कर्णधारपद, आता आयपीएल २०२२ मध्ये दिसतील ‘हे’ चार नवीन कर्णधार
IPL 2022 मध्ये विदेशी खेळाडूंची भरमार, जाणून घ्या कोण करणार कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व
धोनीने सीएसकेचे नेतृत्व सोडल्यानंतर अजून एका दिग्गाकडून कर्णधारपद सोडण्याचा इशारा