fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारे ५ क्रिकेटर, दोन नावं आहेत भारतीय

5 Batsman with Most Runs in a Calendar Year in Test Cricket

१४३ वर्षांचा इतिहास असणाऱ्या क्रिकेटमध्ये सर्वात पहिला आला तो क्रिकेट प्रकार म्हणजेच, कसोटी. कसोटी क्रिकेट म्हंटल की फलंदाज आणि गोलंदाजांना पुरता घाम फुटल्याशिवाय राहत नव्हता. हाच तो क्रिकेट प्रकार जिथे फलंदाजांची लागते सर्वाधिक कसोटी. कसोटी हा एक दीर्घ काळ चालणारा क्रिकेट प्रकार असला, तरी यामध्येही अनेक दिग्गज फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी आपले एक वेगळे स्थान मिळविले आहे.

फलंदाजांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातील कोणत्याही खेळाडूची कामगिरी ही त्यांनी मैदानावर केलेल्या धावांवरून गणली जाते. तसेच गोलंदाजांच्या बाबत बोलायचं झालं, तर गोलंदाजाने मैदानावर किती विकेट्स घेतल्या, यावरून त्यांच्या कामगिरीची अंदाज लावला जातो. तसं पाहिलं तर केवळ कसोटी क्रिकेट प्रकारातच नव्हे तर क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमध्ये चांगली कामगिरी करणे फार कठीण असते. परंतु क्रिकेटमध्ये कसोटीच अस्सल क्रिकेट प्रकार समजला जातो.

कसोटी हा असा क्रिकेट प्रकार आहे, जिथे कोणत्याही खेळाडूची कामगिरी ही त्याच्या संयमी आणि तंत्रशुद्ध खेळीच्या आधारे मोजली जाते. फलंदाज ५ दिवसांच्या कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करतात. तरीही कसोटीत धावा इतर क्रिकेट प्रकारांच्या तुलनेत फार जलदगतीने होत नाहीत. पंरतु या प्रकारात खेळाडू किती वेळ खेळपट्टीवर आपले पाय रोवून ठेवतो, हे खूप महत्त्वाचे असते.

चला तर मग आज या लेखात जाणून घेऊया, की एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ६ फलंदाजांबद्दल…

एका वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ६ फलंदाज- 6 Batsman with Most Runs in a Calendar Year in Test Cricket

६. सुनील गावसकर

भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) या यादीत ६ व्या क्रमांकावर आहेत. गावसकरांच्या नावाचा समावेश जगातील महान फलंदाजांमध्ये होतो. ते कसोटीत १०००० धावांचा टप्पा पार करणारे आणि ३० शतके करणारे पहिले क्रिकेटपटू होते. त्यांच्यासाठी १९७९ हे वर्ष खूप महत्त्वपूर्ण ठरले होते. त्यांनी त्यादरम्यान १८ सामने खेळताना ५९.८० च्या सरासरीने १५५५ धावा केल्या होत्या. त्यामध्ये ५ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश होता.

त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत १२५ सामने खेळताना १०,१२२ धावा केल्या होत्या.

५. सचिन तेंडुलकर

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. त्यामध्ये शतकांचे शतक, कसोटी आणि वनडेत सर्वाधिक धावा यांसारख्या अनेक विक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे त्याला ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हटले जाते. सचिनच्या नावावर अनेक विक्रम असले तर एका वर्षात कसोटी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने २०१०मध्ये १४ कसोटी सामने खेळताना ७८.१० च्या सरासरीने १५६२ धावा केल्या होत्या. त्यात ७ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश होता.

सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण २०० सामने खेळताना त्यांनी १५९२१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ५१ शतके आणि ६८ अर्धशतके ठोकली आहेत.

४. मायकल क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल क्लार्कसाठी (Michael Clarke) २०१२ हे वर्ष खूपच भारी राहिले होते. या वर्षात त्याने ११ कसोटी सामने खेळताना १०६.३३ च्या सरासरीने तब्बल १५९५ धावा ठोकल्या होत्या. त्यात ५ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. या वर्षाच्या सुरुवातीला क्लार्कने भारताविरुद्ध त्रिशतकी खेळी केली होती. सिडनीमध्ये क्लार्कने ठोकलेले त्रिशतक हे त्याने आपल्या घरच्या मैदानावर ठोकलेले पहिले त्रिशतक होते.

त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ११५ सामने खेळताना ८६४३ धावा केल्या होत्या.

३. ग्रॅमी स्मिथ

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी फलंदाज ग्रॅमी स्मिथचे (Graeme Smith) नाव जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये घेतले जाते. स्मिथने २००८मध्ये १५ कसोटी सामने खेळले होते. त्यात त्याने ७२ च्या सरासरीने १६५६ धावा केल्या होत्या. त्यामध्ये ६ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश होता. ते वर्ष स्मिथसाठी खूप महत्त्वपूर्ण होते. स्मिथचे नाव एका वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा बनविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ११७ सामने खेळताना ९२६५ धावा केल्या आहेत.

२. सर विवियन रिचर्ड्स

वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज सर विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) यांचे नाव ७० आणि ८० च्या दशकात चांगलेच प्रसिद्ध होते. इतकेच नव्हे तर आजही त्यांची गणना जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये होते. आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी लाखो- करोडो चाहत्यांची मने जिंकली. परंतु १९७६ हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात चांगले वर्ष असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. कारण त्यांनी कामगिरीच तशी केली होती. त्या वर्षी रिचर्ड्स यांनी ११ कसोटी सामने खेळले होते. त्यामध्ये त्यांनी ९० च्या सरासरीने १७१० धावा केल्या होत्या. त्यात ७ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश होता.

रिचर्ड्स यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण १२१ सामने खेळताना ८५४० धावा केल्या होत्या.

१. मोहम्मद युसूफ

एका वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, पाकिस्तानचा दिग्गज माजी फलंदाज मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf). २००६ हे वर्ष युसूफसाठी खूप महत्त्वपूर्ण राहिले. या वर्षात त्याने ११ कसोटी सामने खेळले. त्यात त्याने ९९.३३ च्या सरासरीने तब्बल १७८८ धावा केल्या. त्याच वर्षी युसूफने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर सर्वाधिक ९ शतके आणि ३ अर्धशतके कुटली. याव्यतिरिक्त त्याने लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात २०२ धावा केल्या. तसेच वर्षाच्या शेवटी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ६६५ धावा केल्या होत्या.

त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ९० कसोटी सामने खेळताना ७५३० धावा केल्या होत्या.

वाचनीय लेख-

-गोलंदाजीत अतिशय हटके विक्रम करणारे ४ भारतीय, कहर म्हणजे विराटही आहे यात सामील

-२०१० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक झेल घेणारे ५ क्षेत्ररक्षक

-असे ५ क्रिकेटर, जे आहेत डावखुरे फलंदाज परंतु करतात उजव्या हाताने गोलंदाजी

You might also like