fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

गोलंदाजीत अतिशय हटके विक्रम करणारे ४ भारतीय, कहर म्हणजे विराटही आहे यात सामील

4 bawling records held by Indian cricketer

-विनायक धुमाळ

भारतीय क्रिकेट इतिहासात असे अनेक महान गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या उत्कृष्ठ गोलंदाजीच्या जोरावर मोठं-मोठे विक्रम करून भारतीय संघाची मान उंचाविली आहे. या लेखातही आज अशा गोलंदाजीतील विश्वविक्रमांबद्दल आढावा घेतला आहे जे केवळ भारतीय गोलंदाजांच्या नावावर आहेत.

४. दीपक चाहर-

दीपक चाहरच्या नावावर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीचा विश्वविक्रम आहे. नागपूर येथे नोव्हेंबर २०१९ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात टी२० सामना खेळला गेला होता. हा सामना भारतीय संघाने ३० धावांनी जिंकला. या नागपूर टी२० सामन्यामध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना दीपक चाहरने हॅटट्रिकही घेतली होती. तसेच त्याने या सामन्यात ३.२ षटकांमध्ये फक्त ७ धाव देऊन ६ गडी बाद केले होते.

त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. त्याचबरोबर त्याने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विश्वविक्रमही केला होता.

३. बापू नाडकर्णी-

बापू नाडकर्णी यांच्या नावे आहे कसोटी क्रिकेटमध्ये सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम आहे. १२ जानेवारी १९६४ रोजी, भारतीय फिरकीपटू बापू नाडकर्णी यांनी इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या मैदानात सलग २१ निर्धाव षटके फेकल्याचा विक्रम नोंदविला होता. त्यावेळेस त्यांनी एकूण टाकलेल्या ३२ षटकांमध्ये २७ षटके निर्धाव टाकत फक्त ५ धावा दिल्या होत्या. यातील सलग २१ षटके निर्धाव होती. त्यांनी भारतासाठी ४१ कसोटी सामने खेळताना १४१४ धावा केल्या आहेत. तर ८८ विकेट देखील घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी ४ वेळा डावांमध्ये ५ विकेट आणि एक वेळा एका सामन्यात १० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

२. विराट कोहली-

विराट कोहलीने गोलंदाजी करताना एकही चेंडू न फेकता विकेट मिळवण्याचा कारनामा केला आहे. आत्तापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचे काम केले आहे. असे बरेच गोलंदाज आहेत ज्यांनी पहिल्या चेंडूवर विकेट नोंदवल्या आहेत, परंतु यादरम्यान विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत वेगळ्या प्रकारचा विक्रम केला आहे.

विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतील पहिली विकेट एकही चेंडू न फेकता घेतली आहे. म्हणजेच शून्या चेंडूसह विकेट मिळवणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे.

खरं तर, विराट कोहली २०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध मॅनचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यात गोलंदाजी करत असताना त्याने त्याच्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू लेग स्टंपवर वाइड केला. त्यावर फलंदाजी करताना केविन पीटरसनचा पाय उठला आणि धोनी विकेटच्या मागे स्टंप आउट केले. केविन पीटरसन बाद झाला आणि कोहलीला वाइड बॉलवर पहिली विकेट मिळाली. त्यामुळे त्या चेंडूनंतर त्याच्या नावापुढे त्याचे गोलंदाजी आकडे 0.0-0-0-1 असे दिसत होते.

१. अमित मिश्रा आणि जवागल श्रीनाथ –

भारताचे गोलंदाज अमित मिश्रा आणि जवागल श्रीनाथ यांच्या नावावर एका द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम आहे. मिश्राने २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना ५ सामन्यांच्या मालिकेत १८ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच २००२-०३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या ७ सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीनाथनेही १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे एका द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम संयुक्तरित्या मिश्रा आणि श्रीनाथच्या नावावर आहे.

ट्रेंडिंग लेख –

२०१० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक झेल घेणारे ५ क्षेत्ररक्षक

असे ‘बाप- लेक’ क्रिकेटर, ज्यांनी एकाच सामन्यात खेळताना केली ‘बाप’ कामगिरी

असे ५ क्रिकेटर, जे आहेत डावखुरे फलंदाज परंतु करतात उजव्या हाताने गोलंदाजी

You might also like